Judge Cash Case : न्यायमूर्ती वर्मांची अलाहाबाद हायकोर्टात बदली

बेहिशोबी रोख रक्कम घरी सापडल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
Judge Cash Case : न्यायमूर्ती वर्मांची अलाहाबाद हायकोर्टात बदली
Published on

नवी दिल्ली : बेहिशोबी रोख रक्कम घरी सापडल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी न्यायमूर्ती वर्मा यांच्या बदलीचा हा निर्णय जाहीर केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २० व २४ मार्च रोजी झालेल्या बैठकीत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना अलाहाबादला पाठवण्याची शिफारस केली होती. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ही शिफारस केल्यानंतर आता न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर या निर्णयाच्या संदर्भातील निवेदन जारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, वकिलांच्या निषेधाला न जुमानता त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीत बेहिशोबी रोख रक्कम सापडल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या संपूर्ण प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा रंगली. आगीत जळालेल्या नोटांचे तुकडे आढळून आल्यानंतर चर्चेत आलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बदलीची शिफारस करण्यात आली आहे.

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच सरन्यायाधीशांनी न्यायमूर्ती वर्मा यांना दिल्ली उच्च न्यायालयातील कोणतेही प्रकरण सुनावणीसाठी न देण्याचे निर्देश दिल्लीतील मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिले होते. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आपल्या संकेतस्थळावर न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरी सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोख रकमेचे व्हिडीओ आणि छायाचित्रे जारी केली होती. त्यामुळे न्यायमूर्ती वर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली असतानाच सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती वर्मा यांची दिल्लीतून पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय जाहीर केला.

अलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशनचा बदलीला विरोध

अलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशनने न्यायमूर्ती वर्मा यांच्या बदलीला विरोध केला आहे. वर्मा यांची बदली अलाहाबादला नको, अशी मागणी करत अलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशनने मंगळवारपासून संपावर जाणार असल्याचे जाहीर केले.

logo
marathi.freepressjournal.in