
राज्यासह देशात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. नुकताच बिहारच्या राणीगंज येथे शुक्रवारी पहाटे गुन्हेगारांनी दैनिक जागरणचे पत्रकार विमल कुमार यादव यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या गुन्हेगारांनी पहाटेच्या सुमारास विमल कुमार यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. विमल बाहेर येताच गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. राणीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बेलसारातील शोरुमच्या मागे ही घटना घडली.
दोन वर्षापूर्वी मृत पत्रकार विमल यादव यांच्या सरपंच भावाची देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. विमल हा त्यांच्या खून खटल्यातील मुख्य साक्षीदार होता. त्यामुळे त्याच्या खुनाचा देखील संशय वक्त केला जात होता. त्याला गुन्हेगारांनी अनेकदा साक्ष देण्यापासून रोखलं होतं, असं देखील सांगण्यात येत आहे.
मृत विमल यांची पत्नी पुजाने सांगितल्यानुसार, काही लोक सकाळी दरवाजा ठोठावत माझ्या पतीच्या नावाने आवाज देत होते. आम्ही दोघे उठून दरवाजा उघडायला गेलो. मी घराचे ग्रील उघडून पती विमल मुख्य गेट उघडण्यासाठी बाहेर पडले. तेवढ्यात गोळीबाराजा आवाज आला. त्यानंतर माझ्या पतीचा आवाज आला , 'पुजा मला गुंडांनी गोळ्या मारल्या." मी तेथे पोहचले तेव्हा ते खाली पडले होते आणि त्यांच्या छातीतून रक्त येत होतं.
यानंतर पुजाने आरडाओरडा करुन स्थानिकांना गोळा केलं. राणीगंज पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. माहिती दिल्यानंतर राणीगंजचे एसएचओ कौशल कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विमलला राणीगंज रेफरल हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासून विमलला मृत घोषित केलं. यानंतर विमलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अररिया रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी स्थानिकांची प्रचंड गर्दी झाली होती.