
नवी दिल्ली : विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस केली असून हा बहुमान पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुपुत्राला मिळणार आहे. न्या. खन्ना यांनी न्या. भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केली आहे. न्या. गवई यांना केवळ सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काही महिन्यांनीच बदलत आहेत. माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच नोव्हेंबर २०२४ ला निवृत्ती घेतली होती. त्यांच्या जागी सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आले होते. पाच महिने होत नाही तोच त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस केली आहे.
सरन्यायाधीश खन्ना यांनी न्या. बी. आर. गवई यांच्या नावाची शिफारस केली आहे. यामुळे गवई हे ५२ वे सरन्यायाधीश बनणार आहेत. चंद्रचूड वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर न्या. खन्ना यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता.
न्या. गवई हे येत्या १४ मे रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. सध्या तेच सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या न्या. गवईं यांना शपथ देणार आहेत. न्या. गवई सहा महिनेच या पदावर असतील, कारण ते नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. २०१९ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले होते.