

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश संजीव प्रकाश शर्मा यांच्यावर गंभीर प्रशासकीय अनियमितता, पक्षपात आणि प्रकरणांच्या निवडक वाटपाचे आरोप करत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. संदीप मेहता यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांना पत्र लिहिले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचे कामकाज पारदर्शक राहावे यासाठी राज्याबाहेरील मुख्य न्यायमूर्तींची 'तातडीने' नियुक्ती करण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
न्या.मेहता यांनी २ ऑगस्ट, १० ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी लिहिलेल्या तीन वेगवेगळ्या पत्रांमध्ये कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती शर्मा यांच्यावर "कुप्रशासन", "गैरप्रकार", "नातेवाईकशाही" आणि "पक्षपात" यांसारखे गंभीर आरोप केले आहेत.न्या. शर्मा यांनी 'मास्टर ऑफ द रोस्टर' या अधिकाराचा गैरवापर करत श्रीमंत आणि प्रभावशाली पक्षकारांशी संबंधित प्रकरणांना इतर खंडपीठांवरून काढून स्वतःच्या खंडपीठाकडे वर्ग केले, असा थेट आरोप पत्रात करण्यात आला आहे.