केजरीवाल अटकेप्रकरणी हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; अंतिम निर्णय ३ एप्रिलला

विद्यमान मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या तोंडावर अटक करणे हे घटनेच्या मूलभूत रचनेच्या विरोधात आहे, आपल्याला आणि पक्षाला अकार्यक्षम करणे हा अटकेमागील उद्देश आहे, असा युक्तिवाद केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी यावेळी केला.
केजरीवाल अटकेप्रकरणी हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; अंतिम निर्णय ३ एप्रिलला

नवी दिल्ली : मद्यघोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगप्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. केजरीवाल यांच्या अटकेला आणि ईडी कोठडीला आपच्या नेत्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याचप्रमाणे २ एप्रिलपूर्वी आपल्याला अंतरिम दिलासा द्यावा, अशी याचिका केली होती. त्यासंदर्भात न्या. स्वर्णकान्त शर्मा यांनी ईडीला नोटीस पाठविली असून त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

सदर प्रकरण अंतिम निकाली काढण्यासाठी ३ एप्रिल ही तारीख न्या. शर्मा यांनी मुक्रर केली आहे, सुनावणी स्थगित करण्याची अनुमती दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या तोंडावर अटक करणे हे घटनेच्या मूलभूत रचनेच्या विरोधात आहे, आपल्याला आणि पक्षाला अकार्यक्षम करणे हा अटकेमागील उद्देश आहे, असा युक्तिवाद केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी यावेळी केला.

भारताने दिली समज

भारतातील काही कायदेशीर कार्यवाहीप्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने केलेल्या टिप्पणीबाबत आम्ही तीव्र निषेध करतो. इतरांच्या सार्वभौमत्वाचा आणि अंतर्गत बाबींचा आदर करणे आम्हाला अपेक्षित आहे. भारताच्या कायदेशीर प्रक्रियांवर आणि एक स्वतंत्र न्यायव्यवस्था जी वस्तुनिष्ठ आणि वेळेवर निकालासाठी वचनबद्ध आहे, त्यावर आक्षेप घेणे अयोग्य आहे, अशा शब्दात भारताने अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांना समज दिली.

सरकारचा कारभार कारागृहातून चालविता येणार नाही; राज्यपालांचे मत

दिल्ली सरकारचा कारभार कारागृहातून चालविता येणार नाही, असे दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी बुधवारी येथे सांगितले. अरविंद केजरीवाल हे कोठडीत असले तरीही तेच मुख्यमंत्री असतील, असे वक्तव्य आपच्या नेत्यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर सक्सेना यांनी वरील मत व्यक्त केले आहे.

आपच्या नेत्यांनी वेळोवेळी केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली असून ते कारागृहातूनच सरकारचा कारभार पाहतील, असे सातत्याने स्पष्ट केले. त्यामुळे एका वाहिनीच्या कार्यक्रमात सक्सेना म्हणाले की, दिल्लीच्या जनतेला आपण आश्वस्त करू शकतो की सरकारचा कारभार कोठडीतून चालविता येऊ शकत नाही.

लहानपणी आपण ‘लोखंडाचे चणे खाणे’ अशी म्हण ऐकली आहे. मात्र, दिल्लीत आल्यानंतर आपल्याला त्या म्हणीचा खरोखरच प्रत्यय आला, असे सक्सेना म्हणाले.

दिल्लीत एखादे काम करणे लोखंडाचे चणे खाण्यासारखे!

दिल्लीमध्ये एखादे काम करून घेणे हे लोखंडाचे चणे खाण्यासारखेच आहे, एखादे काम तुम्ही करावयास सुरू केले की काही शक्ती ते हाणून पाडण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावतात आणि तुम्ही काम पूर्ण केले तर याच शक्ती त्याचे श्रेय घेण्यासाठी टपलेल्या असतात, असेही नायब राज्यपाल म्हणाले.

केजरीवाल आज मोठा गौप्यस्फोट करणार! सुनीता केजरीवाल यांचा सूचक इशारा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवार, २८ मार्च रोजी कथित मद्यघोटाळ्याप्रकरणी न्यायालयात मोठा गौप्यस्फोट करतील, असे केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी बुधवारी येथे सांगितले. सक्तवसुली संचालनालयाने अनेकदा छापे टाकूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने २१ मार्च रोजी मद्यघोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी अटक केली असून त्यांना २८ मार्चपर्यत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आपले पती अरविंद केजरीवाल २८ मार्च रोजी न्यायालयात सत्य सांगतील आणि त्याबाबतचे पुरावेही सादर करतील. जवळपास दोन वर्षे तपास करूनही ईडीला पुरावा म्हणून एक पैसाही मिळालेला नाही, ईडीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छापे टाकले, मात्र, त्यांना केवळ ७३ हजार रुपयेच मिळाले, असेही सुनीता केजरीवाल म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in