

हैदराबाद : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि 'तेलंगणा जागृती' च्या अध्यक्षा के. कविता यांनी शनिवारी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. त्यांनी या पक्षाला 'तेलंगणा राष्ट्र समिती' असे नाव दिले असून, आपल्या वडिलांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. केसीआर आता बदलले असून ते "आत्मा हरवलेले व्यक्तिमत्त्व" बनले आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
वडिलांच्या जुन्या नावाचाच आधार
विशेष म्हणजे, केसीआर यांनी स्थापन केलेल्या मूळ पक्षाचे नाव 'तेलंगणा राष्ट्र समिती' असेच होते. मात्र, २०२२ मध्ये राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी त्याचे नाव बदलून 'भारत राष्ट्र समिती' केले होते. आता कविता यांनी वडिलांनी सोडलेले जुने नाव आपल्या पक्षासाठी निवडून एक प्रकारे थेट आव्हान दिले आहे.
वडिलांवर आणि भावावर टीकास्त्र
शहराच्या बाहेरील भागात आयोजित एका कार्यक्रमात कविता यांनी सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि वडिलांच्या बीआरएस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी केसीआर आणि त्यांचे भाऊ के. टी. रामा राव यांच्यावर राजकीय अपरिपक्वतेचा आरोप केला.
"केसीआर म्हणतात की जनतेने त्यांना सत्ता न देऊन चूक केली. जर माझ्या मुलाने चूक केली, तर आई म्हणून मी त्याला सोडून देणार का?
त्याची काळजी घेणार नाही का? पण केसीआर आज जनतेच्या प्रश्नांपासून दूर पळाले आहेत," असे कविता म्हणाल्या. त्यांनी पुढे म्हटले की, "आजचे केसीआर हे पूर्वीचे राहिलेले नाहीत. ते एका यंत्राप्रमाणे वागत आहेत. ते 'कोल्ह्यांच्या' विळख्यात अडकले आहेत. जर ते आमचे जुने केसीआर असते, तर आम्ही त्यांच्या चरणांना स्पर्श केला असता. पण सध्याचे केसीआर हे आत्मा नसलेली एक बाहुली आहेत."
'पांचजन्य' जाहीरनामा आणि प्रमुख आश्वासने
२०२८ च्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करत कविता यांनी 'पांचजन्य' नावाचा पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला
मोफत शिक्षण आणि आरोग्य सेवा
शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आणि विशेष उपाययोजना
एकाच अधिसूचनेद्वारे ४ लाख सरकारी नोकऱ्यांची भरती
'सामाजिक तेलंगणा' अंतर्गत बीसी (मागसवर्गीय) समाजाला खासदार आणि आमदार पदांसाठी ५० टक्के आरक्षण
भ्रष्टाचार आणि कालेश्वरम प्रकल्पाचा मुद्दा
कालेश्वरम सिंचन प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारावर बोट ठेवल्यामुळे केसीआर यांनी आपल्याला पक्षाबाहेर काढले, पण भ्रष्ट लोकांना मात्र सोबत ठेवले, असा दावा कविता यांनी केला. तेलंगणावरील प्रेमापोटी त्यांनी पालमुरू रंगा रेड्डी प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी पक्ष विस्तारासाठी पंजाब आणि बिहारमध्ये फिरण्याला प्राधान्य दिले, अशी टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि भाजपवर निशाणा
कविता यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची तुलना 'हिटलर 'शी केली. राज्यातील घरांची पाडकाम कारवाई, निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू आणि पोलीस कोठडीतील दलित तरुणाचा मृत्यू यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच, भाजपने तेलंगणा निर्मितीला कधीही मनापासून पाठिंबा दिला नाही आणि राज्यातील भाजप खासदारांनी आंध्र प्रदेशात गेलेली पाच गावे परत आणून दाखवावीत, असे आव्हान त्यांनी दिले.
पार्श्वभूमी :
कालेश्वरम प्रकल्पाच्या मुद्द्यावरून चुलत भाऊ टी. हरीश राव आणि जे. संतोष कुमार यांच्यावर आरोप केल्यानंतर, सप्टेंबर २०२५ मध्ये कविता यांची बीआरएस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून त्या 'तेलंगणा जागृती 'च्या माध्यमातून कार्यरत होत्या.