

विशाखापट्टणम : भारताने बंगालच्या उपसागरात अण्वस्त्र पाणबुडी आयएनएस अरिघातवरून ‘के-४’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची गुरुवारी चाचणी यशस्वी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५०० किमी आहे.
संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, ही चाचणी विशाखापट्टणम येथील किनाऱ्यावर करण्यात आली. भारत जमीन, हवा व समुद्रातूनही अण्वस्त्र डागू शकतो. हे क्षेपणास्त्र २ टन अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. ‘के’ मालिकेतील क्षेपणास्त्रातील ‘के’ अक्षर हे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ ठेवले आहे. ‘के-४’ हे क्षेपणास्त्र जमिनीवरून मारा करणारे ‘अग्नि’ मालिकेतील आधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. पाणबुडीतून मारा करण्यासाठी त्याला बनवले आहे. हे क्षेपणास्त्र पहिल्यांदा समुद्रातून बाहेर येते.
त्यानंतर ते आपल्या लक्ष्यावर तुटून पडते. हे क्षेपणास्त्र अरिहंत श्रेणीतील पाणबुडीवरून डागले जाऊ शकते. ‘के-४’ या क्षेपणास्त्राची चाचणी महत्त्वाची आहे. कारण यामुळे भारताची मारक क्षमता अधिक विकसित होते. आपल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाऊ शकते, असा मानसिक दबाव संभाव्य शत्रूवर येतो.
या क्षेपणास्त्राची चाचणी विशाखापट्टणम येथील किनारपट्टीवरून करण्यात आली. यासाठी ‘आयएनएस अरिघात’ या पाणबुडीचा वापर करण्यात आला. या चाचणीनंतर सर्व तांत्रिक निकष व मिशनचे तपशीलवार विश्लेषण केले जाईल.