‘ते ट्विट साधे नव्हते, त्यामध्ये तुम्ही मीठमसाला टाकला’; कंगना रणौत यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी २०२०-२१ मध्ये दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या वेळी त्या आंदोलनाबद्दल केलेल्या अपमानजनक टिप्पणीप्रकरणी पंजाबमधील न्यायालयात सुरू असलेला खटला रद्द करण्याची मागणी करणारी केलेली याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
‘ते ट्विट साधे नव्हते, त्यामध्ये तुम्ही मीठमसाला टाकला’;  कंगना रणौत यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Published on

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी २०२०-२१ मध्ये दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या वेळी त्या आंदोलनाबद्दल केलेल्या अपमानजनक टिप्पणीप्रकरणी पंजाबमधील न्यायालयात सुरू असलेला खटला रद्द करण्याची मागणी करणारी केलेली याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे कंगना रणौत यांना शेतकरी आंदोलनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी लागली आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, आम्ही तुमच्या ट्विटवर (एक्सवरील पोस्ट) कोणतीही टिप्पणी करू इच्छित नाही. ते काही साधारण रिट्विट नव्हते, त्यामध्ये तुमची टिप्पणीही होती, तुम्ही त्यामध्ये मीठमसाला टाकण्याचे काम केले आहे, असे स्पष्ट करून न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने याचिकेवर विचार करण्यास नकार दिला आणि त्यांना याचिका मागे घेण्याचा सल्ला दिला.

पंजाबमधील भटिंडा येथील ७३ वर्षीय महिंदर कौर यांनी २०२१ मध्ये कंगना रणौत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत कौर यांनी म्हटले होते की, कंगना यांनी शेतकरी आंदोलनाविरोधातील एक ट्विट रिट्विट करत सर्व शेतकऱ्यांबाबत अपमानजनक वक्तव्य केले होते. महिंदर कौर यांचा फोटो असलेले ट्विट रिट्विट करत कंगना म्हणाल्या होत्या की, ही तीच बिल्कीस बानो आजी आहे, जी शाहीन बाग आंदोलनात सहभागी झाली होती.

कंगना यांचे वकील म्हणाले, माझ्या अशील कंगना रणौत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, “कनिष्ठ न्यायालयात स्पष्टीकरण देता येते. त्यावर वकील म्हणाले, कंगना पंजाबमधील न्यायालयात उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, मग त्यांनी वैयक्तिक कारणे, जी काही असतील ती सांगून सूट मागावी.

टिप्पणी करण्यास भाग पाडू नका

कंगना रणौत यांचे वकील युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर न्यायमूर्तींनी त्यांना इशारा दिला की, कंगना यांना प्रतिकूल टिप्पणी सहन करावी लागू शकते. त्यांनी केलेल्या रिट्विटमधील व मूळ ट्विटमधील मजकुरावर टिप्पणी करण्यास आम्हाला भाग पाडू नका. तसे केल्यास तुमच्या सुनावणीवर परिणाम होईल. तुमच्याकडे बचाव करण्यासाठी जे काही आहे ते वापरा.

logo
marathi.freepressjournal.in