'राज्यपालांना या घटना थांबवता आल्या असत्या, पण...'; वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करता तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींबाबत केले मोठे विधान
'राज्यपालांना या घटना थांबवता आल्या असत्या, पण...'; वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

आज सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. यावेळी आज दुपारपर्यंत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. याद्वारे त्यांनी अनेक प्रश्न न्यायालयासमोर ठेवले. या युक्तिवादादरम्यान तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवर अनेक बाबी न्यायालयासमोर मांडल्या आहेत. एकनाथ शिंदे हे बंड करणार असल्याची माहिती राज्यपालांना होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, राज्यपालांना या घटना थांबवता आल्या असत्या, असा युक्तिवाद त्यांनी केला.

कपिल सिब्बल म्हणाले की, "घटनेने राज्यपालांना काही अधिकार दिले आहेत हे मान्य आहेत. मात्र कोणत्या अधिकारामध्ये एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी शपथ दिली? राज्यपालांकडे बहुमताचा दावा घेऊन जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आले होते, तेव्हा काही गोष्टींचा विचार करायला हवा होता. त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई प्रलंबित होती, हे माहित असूनही शपथ द्यायची की नाही? याचा विचार करायला हवा होता. ज्या आमदारांना घडलेल्या नोटिसांचे उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदत होती, तर राज्यपालांनी त्यांना १२ जुलैपर्यंत थांबायला का सांगितले नाही?" असा प्रश्न वकील कपिल सिब्बल यांनी विचारला.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेत बंड करणार याची कल्पना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना होती, असा गंभीर आरोप सिब्बल यांनी न्यायालयात केला. "राज्यपाल हे घटनात्मक पद असून त्यांनी या पदाचा दुरूपयोग केला. तसेच एकनाथ शिंदेंची प्रत्येक कृती पक्षविरोधी होती," असे ते म्हणाले. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. १६ आमदार हे कसे अपात्र ठरतात? हे सांगण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं उदाहरण दिले. राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी घटनेचे पालन केले नाही. त्यांनी एकनाथ शिंदेंचे काहीही ऐकायला नको होते, असेही कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले. तसेच, "एकनाथ शिंदे हे आत्ता मुख्यमंत्री पदावर असले तरीही ज्यावेळी त्यांनी बंड केलं त्यावेळी त्यांची ती कृती चुकीची होती. त्यांना रोखणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांंचे कर्तव्य होते. घटनात्मक पद असूनही राज्यपालांनी सत्तानाट्यामध्ये राजकारण केले." असा युक्तिवाद त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in