

श्रीनगर : ‘भारत नवनवीन कल्पनांचे मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे मार्ग शोधत आहे. भारत लढाऊ जहाजे डिझाइन करत आहे, तर पाकिस्तान दहशतवादी कारवायां मध्ये गुंतलेला आहे, अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. कारगिल विजयदिनाच्या सोहळ्यात संरक्षण मंत्री बोलत होते. दरम्यान देशभरात विजयदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
संरक्षण मंत्र्यांनी लडाखमधील द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियलमध्ये शहिदांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तान आपले नीच मनसुबे घेऊन आपल्या समृद्धीच्या मार्गात अडथळे निर्माण करत असेल, तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी आपल्या सेना सज्ज आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
भारताचा इरादा पूर्णपणे स्पष्ट आहे. पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही. जर चर्चा झालीच, तर ती फक्त पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरवर होईल, जो भारताचा अविभाज्य भाग आहे आणि ज्यावर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. कारगिल युद्ध स्मारकात संपूर्ण भारत दिसतो. येथे शहीद झालेल्यांमध्ये हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, तामिळनाडू यासह देशाच्या प्रत्येक भागातील जवानांची नावे नोंदवली आहेत.