
कोप्पल : दलित समाजाच्या झोपड्या जाळल्याप्रकरणी कोप्पल जिल्हा न्यायालयाने १०१ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींना दोषी ठरविले आणि गुरुवारी त्यांना शिक्षा ठोठावली. देशातील कोणत्याही जाती-संबंधित प्रकरणातील ही सर्वात मोठी सामूहिक शिक्षा आहे.
गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावात २८ ऑगस्ट २०१४ रोजी जातीय वादातून हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. याप्रकरणी या सर्वांना दोषी ठरवण्यात आले होते.
दलितांना केशकर्तनालयात आणि उपहारगृहात प्रवेश नाकारण्याच्या प्रकरणावरून ही चकमक उडाली होती. दलितांच्या झोपड्यांना आरोपींनी आग लावली होती. १० वर्षे चाललेल्या खटल्यादरम्यान एकूण ११७ - आरोपींपैकी १६ जणांचा मृत्यू झाला होता.
न्यायमूर्ती चंद्रशेखर सी यांनी दोषींना २ हजार ते ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
तीन महिने या परिसरात होती दहशत
यावेळी झालेल्या हिंसाचाराची दहशत इतकी होती की संपूर्ण परिसर तीन महिने पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवावा लागला. याकाळात पोलीस ठाण्याला अनेक दिवस घेराव घालण्यात आला. या हिंसाचारातील सर्व आरोपी सध्या बल्लारी मध्यवर्ती कारागृहात आहेत.