
हावेरी : कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक मिनी बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मृत शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील एमिहट्टी गावातील आहेत. ते देवी यल्लम्माचे दर्शन घेऊन बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथून परतत होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बसचालकाला झोप लागल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. या व्हॅनमधून १७ जण प्रवास करत होते. त्यातील ११ जण जागीच ठार झाले, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. चार जखमींपैकी दोघांना रुग्णालयाच्या आयसीयूत दाखल केले आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.