कर्नाटकात मुलांना सोशल मीडिया वापरास बंदी; आता १६ वर्षांखालील मुलांना इंटरनेट वापरणे होणार अवघड

कर्नाटकात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणा केली. मुलांवर मोबाईल फोन वापराचे नकारात्मक परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने...
कर्नाटकात मुलांना सोशल मीडिया वापरास बंदी
कर्नाटकात मुलांना सोशल मीडिया वापरास बंदी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

बंगळुरू : कर्नाटकात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणा केली. मुलांवर मोबाईल फोन वापराचे नकारात्मक परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आल्याचे सिद्धरामय्या त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे १६ वर्षांखालील मुलांना आता इंटरनेटचा वापर करणे अवघड होणार आहे.

मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनले आहे. गोवा, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये सोशल मीडिया निर्बंधांवरही जनतेकडून अभिप्राय मागवला जात आहे. गेल्या महिन्यात राज्य उच्च शिक्षण परिषदेच्या कुलगुरूंशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचे उदाहरण देत सोशल मीडिया वापरावरील वय-आधारित निर्बंधांवर चर्चा केली. या काळात सरकारने सोशल मीडिया बंदीसाठी आंतरराष्ट्रीय मॉडेल्सचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

उपाययोजनांचा गांभीर्याने विचार

कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान (आयटी अँड बीटी) मंत्री प्रियांक खर्गे यांनी ३० जानेवारीला कर्नाटक विधानसभेत सांगितले होते की, सोशल मीडियावर तरुणांचा वाढता प्रभाव पाहता, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सोशल मीडियाचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार काही उपाययोजना करण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळण्यासाठी काय करता येईल हे पाहण्यासाठी आम्ही संबंधितांशी सल्लामसलत सुरू केली आहे, असेही प्रियांक खर्गे यांनी सांगितले होते.

कॅम्पस स्थापन होणार

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की, इस्रो आणि केओनिक्सच्या सहकार्याने आयआयएससी अंतर्गत ‘बंगळुरू रोबोटिक्स’ आणि ‘एआय इनोव्हेशन झोन’ नावाचे रोबोटिक्स आणि एआय कॅम्पस स्थापन केले जाणार आहे. सोशल मीडियाच्या नकारात्मक परिणामांमुळे आणि १६ वर्षांखालील मुलांचा मोबाईल फोनचा वाढता वापर यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in