कर्नाटक मुख्यमंत्रीपदावरून वाद, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे समर्थक दिल्लीत तळ ठोकून

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मानणारा काँग्रेसमधील एक गट गुरुवारी नवी दिल्लीत दाखल झाला आहे. डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, अशी विनंती त्यांच्याकडून केली जात आहे.
डी.के. शिवकुमार
डी.के. शिवकुमार
Published on

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेले नाराजीनाट्य आता दिल्ली दरबारी पोहोचले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मानणारा काँग्रेसमधील एक गट गुरुवारी नवी दिल्लीत दाखल झाला आहे. डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, अशी विनंती त्यांच्याकडून केली जात आहे.

किमान १५ आमदार आणि अनेक विधानपरिषद सदस्यांनी डी.के. शिवकुमार यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याची विनंती करण्यासाठी नवी दिल्लीत तळ ठोकला आहे. ही मागणी २०२३ मध्ये झालेल्या सत्ता-वाटप करारावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.

शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी

विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ (२० नोव्हेंबरपर्यंत) पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवायचे असे ठरल्याचा दावा केला जात आहे. परंतु, काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या मुख्यमंत्री बदलावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही.

भाजपकडून बदनामीची मोहीम

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी शुक्रवारी सांगितले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याशी आपण चर्चा केली. त्यांनी आरोप केला की, अंतर्गत फूट पडलेला कर्नाटक भाजप आणि काही विशिष्ट माध्यम समूह जाणीवपूर्वक कर्नाटक काँग्रेस सरकारविरुद्ध बदनामी मोहीम चालवत आहेत.

सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, त्यांचा आपल्या पदावर कायम राहण्याचा आणि भविष्यातही राज्याचे अर्थसंकल्प सादर करण्याचा मानस आहे. पुढील दोन वर्षे अर्थसंकल्प तुम्ही सादर करणार का, या प्रश्नावर सिद्धरामय्या प्रतिप्रश्न करत म्हणाले, तुम्ही असे का विचारत आहात, होय, मी पुढेही मुख्यमंत्री राहीन आणि पुढील अर्थसंकल्पही सादर करेन. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडला असल्याचे सांगितले.

शिवकुमार काय म्हणाले?

आमदारांच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार म्हणाले, मला याबद्दल माहिती नाही, माझी तब्येत ठीक नाही. सिद्धरामय्या यांनी त्यांच्या पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळावर जोर दिल्याचे विचारले असता, शिवकुमार यांनी उत्तर दिले, मला याचा खूप आनंद आहे. आमच्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली आहे. आम्ही सर्व जण एकत्र काम करत आहोत. त्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेबद्दलच्या चर्चा फेटाळून लावल्या.

रोटेशनल फॉर्म्युला

मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या यांनी अडीच वर्षे पूर्ण केल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवकुमार यांच्या समर्थकांकडून ही मागणी जोर धरू लागली आहे. मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर, मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा होती. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली असली तरी, अडीच वर्षांनंतर शिवकुमार सूत्रे हाती घेतील या ‘रोटेशनल फॉर्म्युला’बद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होती.

logo
marathi.freepressjournal.in