कर्नाटकमधील सत्तासंघर्ष टिपेला; सोनिया, राहुल यांच्याशी चर्चा करून विषय सोडविणार - खर्गे

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेला संघर्ष आता टिपेला पोहोचला आहे. त्यामुळे लवकरच ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढणार असल्याचे संकेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत.
कर्नाटकमधील सत्तासंघर्ष टिपेला; सोनिया, राहुल यांच्याशी चर्चा करून विषय सोडविणार - खर्गे
Published on

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेला संघर्ष आता टिपेला पोहोचला आहे. त्यामुळे लवकरच ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढणार असल्याचे संकेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत. येत्या ४८ तासांत राहुल गांधी यांच्याशी बोलून, १ डिसेंबरपर्यंत हा वाद संपवू, असे खर्गे यांनी म्हटले आहे. येत्या १ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत.

सोनिया आणि राहुल यांच्याशी चर्चा करून हा विषय सोडवला जाईल, असे खर्गे यांनी सांगितले आहे. ४८ तासांत खर्गे आणि राहुल गांधी यांची बैठक निश्चित केली जाईल. यानंतर साधारणपणे शुक्रवारी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांना दिल्लीला बोलावले जाईल. कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली आहे. यानंतर चार-पाच लोकांमधील कथित गुप्त करारानुसार, मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

शब्द पाळणे ही मोठी शक्ती

दरम्यान, आपण संपूर्ण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहू आणि पुढील अर्थसंकल्पही सादर करू, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिले की, शब्दाची ताकद हीच जगाची ताकद आहे. दिलेला शब्द पाळणे ही सर्वात मोठी शक्ती आहे. त्यांची ही पोस्ट पक्षश्रेष्ठींना इशारा म्हणून पाहिली जात आहे. रामनगरचे आमदार इकबाल हुसैन यांनी तर शिवकुमार हेच '२०० टक्के' मुख्यमंत्री होतील, अशी भविष्यवाणीच केली आहे.

या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही पक्षश्रेष्ठींना लवकरात लवकर राज्यातील नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर स्पष्टता करण्याची मागणी केली असल्याचे सिद्धरामय्या गटाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. यामुळे आता खर्गे हे राहुल आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून कर्नाटक सत्तासंघर्षावर काय तोडगा काढतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसने २०२३ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्रिपद सिद्धरामय्यांना दिले होते, तर डीके शिवकुमारांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. त्यावेळी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा झाली होती. २० नोव्हेंबर रोजी सिद्धरामय्या यांना अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे, शिवकुमार गट मुख्यमंत्रिपदाची मागणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवकुमार यांचे निकटवर्तीय नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्टींच्या भेटी घेत आहेत. आता काँग्रेस नेतृत्व काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in