
बंगळुरू : सार्वजनिक आरोग्यहितासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला असून नवीन तंबाखूविरोधी कायदा लागू केला आहे. त्यानुसार आता तंबाखूजन्य उत्पादनांच्या खरेदीसाठी त्या व्यक्तीचे वय १८ वरून २१ इतके करण्यात आले आहे. त्यासोबतच कर्नाटक सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घातली असून सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर गुटखा खाऊन थुंकणाऱ्यास १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिगारेट्स आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने विधेयक, २०२४ ला (जाहिरातींवर बंदी आणि व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियमन) मंजुरी दिली. त्यानंतर कर्नाटक सरकारने हा नवीन तंबाखूविरोधी कायदा लागू केला आहे. हा कायदा राज्यात प्रभावीपणे लागू करण्यासाठी २००३ च्या केंद्रीय कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
या सुधारित कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि थुंकण्यास बंदी असेल. तसेच सुमारे ३० खोल्या असलेले हॉटेल्स, ३० पेक्षा जास्त आसनक्षमता असलेली रेस्टॉरंट्स आणि विमानतळांवर निश्चित केलेल्या धूम्रपान क्षेत्रांना सूट दिली जाईल. पण सामान्य सार्वजनिक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
ठळक वैशिष्ट्ये
आता २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना तंबाखू उत्पादने मिळणार नाहीत.
कोणताही दुकानदार २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला सिगारेट, बिडी किंवा इतर तंबाखू उत्पादने विकू शकणार नाही.
कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर अंतरावर तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री पूर्णपणे बंदी असेल.
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करणे आणि थुंकणे आता दंडनीय गुन्हा असेल.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, गुटखा थुंकणे आणि तंबाखू सेवन करणे यावर कडक बंदी असेल.
या नियमांचे उल्लंघन केल्यास आता १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
हुक्का बारवर पूर्ण बंदी, उल्लंघन केल्यास तुरुंगवास आणि दंड
...तर ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास
हुक्का बारवर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास, १ ते ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि त्यासोबत ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. सुधारित कायद्यानुसार, २१ वर्षांखालील कोणालाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास प्रतिबंध असेल. तसेच शैक्षणिक संस्थांपासून १०० मीटर अंतरावर तंबाखू विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.