
म्हैसूर : कर्नाटकात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने किंवा हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिणामी, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचं समोर येतंय.
तपासणीसाठी लांबच लांब रांगा
'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, म्हैसूरमधील जयदेव रुग्णालयात नागरिक हृदय तपासणीसाठी गर्दी करत आहेत. सोशल मीडियावरील छायाचित्रांमध्येही लोकं सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावून बाह्यरुग्ण तपासणीसाठी प्रतीक्षा करताना दिसतायेत. तर, 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, ही परिस्थिती केवळ जयदेव रुग्णालयापुरती मर्यादित नाही. खासगी रुग्णालयांमध्येही हाच ट्रेंड दिसून येतोय.
जवळपासच्या पाच जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या म्हैसूरमधील जयदेव या सरकारी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात पूर्वी सरासरी दररोज ७०० रुग्ण येत होते, ती संख्या आता १००० पर्यंत पोहोचली आहे. तर, नारायण या खासगी रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास पी. यांनीही त्यांच्या रुग्णालयातील हार्ट सेक्शनमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचे म्हटले आहे. ही वाढ सरकारी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागांप्रमाणेच आहे, असे ते म्हणाले. मणिपाल हॉस्पिटलनेही रुग्णसंख्येत २० टक्के वाढ नोंदवली आहे.
घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका; डॉक्टरांचे आवाहन
माध्यमांमध्ये अचानक मृत्यूच्या बातम्या झळकायला लागल्यापासून, विशेषतः हसन जिल्ह्यातील काही तरुणांच्या मृत्यूनंतर, दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्याचे जयदेव रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. जयदेव रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के.एस. सदानंद यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
"माध्यमांमधील बातम्या पाहून लोक घाबरून रुग्णालयात येत आहेत. तथापि, फक्त एकदाच जयदेवमध्ये तपासणी करून काहीही निश्चित होत नाही. हृदयाची तपासणी कोणत्याही जवळच्या उपलब्ध आरोग्य केंद्रात करून घ्यावी. फक्त तपासणी करून उपयोग नाही, जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. जर सगळेच जयदेवमध्ये आले, तर येथे आधीपासून असलेल्या हृदयाच्या रुग्णांवर वेळेवर उपचार करणे कठीण होईल. अफवांवर विश्वास ठेवू नका," असे ते म्हणाले.
४० दिवसांत २३ जणांचा मृत्यू
जयदेव रुग्णालयाच्या म्हैसूर आणि बंगळुरू शाखांमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या ४० दिवसांत हसन जिल्ह्यात २३ जणांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे किंवा हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला. त्यापैकी सहा रुग्ण १९ ते २५ वर्षांतील होते आणि आठ रुग्ण २५ ते ४५ वर्षांतील होते. या घटनेमुळे बंगळुरूतील जयदेव रुग्णालयात रुग्णसंख्येत ८% वाढ झाली आहे. हसन व आजूबाजूच्या जिल्ह्यांतील अनेक नागरिक खबरदारी म्हणून तपासणीसाठी येत आहेत, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
राज्य सरकारने घेतली गंभीर दखल; समिती नेमली
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्य सरकारने या घडामोडींची गंभीर दखल घेतली आहे. या मृत्यूंच्या कारणांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेसचे संचालक डॉ. के.एस. रवींद्रनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.
हसन जिल्ह्यासाठी स्वतंत्र केस स्टडीची शिफारस
या समितीने अलीकडेच आपला अहवाल सरकारकडे सादर केला असून, त्यामध्ये काही महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत. या शिफारसींमध्ये हसन जिल्ह्यातील घटनाक्रमाचा स्वतंत्र केस स्टडी म्हणून अभ्यास करणे याचा देखील समावेश आहे.
...तर धोका ३०–४०% ने कमी होऊ शकतो
डॉ. सी.बी. केशवमूर्ती, मणिपाल हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, यांनी ही रुग्णवाढ राज्यभर वाढलेल्या हृदयविकाराच्या घटनांमुळे जनतेत निर्माण झालेल्या जागरूकतेमुळे असल्याचे सांगितले. "आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारल्यास हृदयविकार आणि झटक्याचा धोका ३०–४०% ने कमी होऊ शकतो," असं त्यांनी सांगितलं.
डॉक्टरांचा इशारा : लक्षणं दिसल्यास तत्काळ तपासणी करा
धूम्रपान टाळणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम आणि तणाव नियंत्रण या साध्या सवयी हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात. छातीत दुखणं, पाठदुखी, डाव्या हाताला वेदना, अतिप्रमाणात घाम येणे, ही लक्षणं हृदयविकाराची नांदी असू शकतात, पण नागरिकांनी घाबरून न जाता जवळच्या वैद्यकीय केंद्रात तपासणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. मद्यपान आणि तंबाखूचे सेवन टाळण्याचाही सल्ला त्यांनी दिला. "हृदयविकाराच्या घटना अनपेक्षित असल्या, तरी योग्य ती काळजी आणि वेळेवर उपचार घेतल्यास धोका टाळता येतो," असं त्यांनी नमूद केलं.
सरकारी रुग्णालयांवर ताण; जनजागृती मोहिमेची गरज
दरम्यान, अनेक डॉक्टरांनी सरकारला जनजागृती मोहिमा राबवण्याचे आवाहन केले आहे. “सरकारी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागांवर आधीच ताण आहे. अचानक मृत्यूच्या नावाखाली भीती पसरवल्याने हा ताण अधिक वाढतो आहे,” असं नाव न सांगण्याच्या अटीवर एका डॉक्टरांनी सांगितलं.