
बेंगळुरू : देशात समान नागरी कायदा लागू होण्याबाबत मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. उत्तराखंड सरकारने यापूर्वीच हा कायदा लागू केला आहे. आता संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू व्हावा, असे आवाहन कर्नाटक उच्च न्यायालयाने केले आहे.
संसद व राज्य विधानसभांनी याला लवकरात लवकर कायद्याचे रूप देण्याचे आवाहन त्यांनी केले. समान नागरी कायदा लागू होणे हे राज्यघटनेच्या मूळ आदर्श असलेल्या न्याय, समानता, सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मता साकार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे कोर्टाने सांगितले.
संपत्तीच्या वादावरून सुरू असलेल्या खटल्यात न्या. हंचाटे संजीव कुमार यांच्या खंठपीठाने हे आवाहन केले. मुस्लिम महिला शाहनाज बेगम हिच्या मृत्यूनंतर संपत्ती वाटपावरून वाद झाला. ज्यात महिलेचा पती व तिचे भाऊ हे पक्षकार होते. विविध धार्मिक कायद्यामुळे महिलांच्या अधिकारांमध्ये मोठ्या प्रमाणात फरक होत आहे. त्यामुळे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे, असे कोर्टाला आढळले.