हुबळी : कर्नाटकमध्ये हुबळी-धारवाड महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयात दिवसाढवळ्या खून करण्यात आला. आरोपी बेळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचे कृत्य महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
आरोपी आणि मृत तरुणी एकाच महाविद्यालयात शिकत होते. आरोपी फयाज (वय २३) याने २१ वर्षीय नेहा हिरेमठचा खून केला. नेहाचा पाठलाग करून फयाजने तिची हत्या केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ पकडले. पोलीस सध्या या घटनेमागचा हेतू तपासत असून एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा संशय आहे.
नेहा हिरेमठ हुबळीच्या केएलई टेक्नोलॉजिकल विद्यापीठात ‘एमसीए’च्या पहिल्या वर्षाला शिकत होती. हत्या झाल्यानंतर नेहाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फयाजचे आई-वडील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. ‘बीसीए’च्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे मागच्या सहा महिन्यांपासून फयाज महाविद्यालयात येत नव्हता. गुरुवारी तो स्वतःबरोबर धारदार शस्त्र घेऊन महाविद्यालयात आला आणि त्याने नेहा हिरेमठ हिच्यावर अनेक वार केले.
नेहा हिरेमठवर वार करून पळाल्यानंतर महाविद्यालयातील इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी नेहाला तत्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून फयाज नेहाचा पिच्छा पुरवत होता.
आरोपीला न्यायालयीन कोठडी
हुबळी-धारवाडच्या पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार यांनी सांगितले की, हे प्रकरण गंभीर असून, आम्ही ‘एफआयआर’ दाखल केला आहे. आरोपीला तत्काळ अटक केली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी ‘लव्ह जिहाद’चा आरोप करीत अभाविपकडून आंदोलन करण्यात आले व आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.