

बेंगळुरू : कर्नाटकातील २०२३ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान आळंद विधानसभा मतदारसंघातील कथित 'मतचोरी' प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजी भाजप आमदार, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या निकटवर्तीयासह एकूण सात जणांची नावे असलेले आरोपपत्र दाखल केले आहे.
बेंगळुरू येथील प्रथम अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात एसआयटीने दाखल केलेल्या या आरोपपत्रात ५,९९४ मतदारांची नावे यादीतून काढून टाकण्याच्या कथित प्रयत्नांचा उल्लेख आहे. सीआयडीतील सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे २२ हजार पानांचे हे आरोपपत्र असून मतदारांची नावे कशी हटवली गेली याची कार्यपद्धती सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आली आहे.
आळंदचे चार वेळा आमदार राहिलेले सुभाष गुट्टेदार, त्यांचा मुलगा हर्षानंद गुट्टेदार, त्यांचे वैयक्तिक सचिव टिप्पेरुद्र, कलबुर्गीतील तीन डेटा सेंटर ऑपरेटर अक्रम पाशा, मुकरम पाशा आणि मोहम्मद अशफाक तसेच पश्चिम बंगालमधील बापी आद्या यांचा समावेश आहे.
आद्या हा या प्रकरणात अटक होणारा पहिला व्यक्ती होता. तो 'ओटीपी बाझार' नावाची वेबसाइट चालवत होता. जी अमेरिकेतील एका प्लॅटफॉर्मशी जोडलेली असून 'ओटीपी बायपास' सुविधा पुरवत असल्याचा आरोप आहे. नंतर त्याला जामिनावर मुक्त करण्यात आले.