काश्मीर घेतोय मोकळा श्वास : पंतप्रधान मोदी; कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच दौरा

जम्मू-काश्मीर हा केवळ एक प्रदेश नाही, तर तो भारताचा मुकुट आहे आणि त्यामुळेच...
काश्मीर घेतोय मोकळा श्वास : पंतप्रधान मोदी; कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच दौरा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हे २०१९ मध्ये रद्द करण्यात आल्यानंतर या प्रदेशाने विकासाबाबत नवी उंची गाठली असून हा प्रदेश आता मोकळेपणे श्वास घेत आहे. विकसित भारतासाठी विकसित जम्मू-काश्मीरला आमचे प्राधान्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे सांगितले.

कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केल्यानंतर मोदी प्रथमच येथे आले आहेत. काँग्रेस पक्ष दीर्घकाळ कलम ३७० बाबत केवळ जम्मू-काश्मीरमधील जनतेचीच नव्हे तर संपूर्ण देशाची दिशाभूल करीत होता, अशी टीकाही मोदी यांनी येथील एका जाहीर सभेत केली. यावेळी मोदी यांनी महाशिवरात्र आणि रमझाननिमित्त सर्वांना आधीच शुभेच्छा दिल्या. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरने जुने पाश तोडून टाकले आहेत, असेही मोदी यांनी ‘विकसित भारत, विकसित जम्मू-काश्मीर’ या मेळाव्यात बोलताना सांगितले.

या भागातील कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या जवळपास पाच हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद‌्घाटन केल्यानंतर मोदी म्हणाले की, श्रीनगरच्या जनतेची भेट घेतल्यानंतर आपल्याला अत्यंत आनंद झाला आहे. गुरुवारी समर्पित करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे जम्मू-काश्मीरच्या विकासाला चालना मिळेल. विकसित भारतासाठी विकसित जम्मू-काश्मीरला आमचे प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले.

जम्मू-काश्मीर हा केवळ एक प्रदेश नाही, तर तो भारताचा मुकुट आहे आणि त्यामुळेच विकसित भारतासाठी आमचे विकसित जम्मू-काश्मीरला प्राधान्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in