
जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला आहे. मंगळवारी रात्री उशिरा सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना देगवार सेक्टरच्या मालदीवेलन भागात संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर ही चकमक सुरू झाली.
गेल्या दोन दिवसातील ही दुसरी चकमक आहे. सुरक्षा दलांनी २८ जुलै रोजी श्रीनगरमधील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवन भागात तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले होते. यामध्ये पहलगाम हल्ल्याचा मुख्य आरोपी सुलेमानचा समावेश होता.
‘ऑपरेशन शिवशक्ती’
दरम्यान, 'ऑपरेशन महादेव' नंतर आता सुरक्षा दल 'ऑपरेशन शिवशक्ती' राबवत आहेत. याअंतर्गत सुरक्षा दलांनी गेल्या ४८ तासांत ४ यशस्वी कारवाया केल्या असून, यात दाचीघम भागात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड देखील ठार मारलेल्या दहशतवाद्यांमध्ये होता.
नागरोटा भागातही पोलिसांनी एका दहशतवाद्याच्या साथीदाराला तीन पिस्तूलांसह अटक केली आहे. या दहशतवादी साथीदाराचे नाव अजान हमीद गाजी आहे, जो श्रीनगरचा रहिवासी आहे. अजान त्याच्या टोयोटा कारमधून जम्मूहून काश्मीर खोऱ्यात जात होता, तेव्हा पोलिसांनी त्याला नागरोटा चेकपोस्टवर थांबवले. तपासात त्याच्याकडे तीन तुर्की आणि चिनी बनावटीच्या पिस्तूल आढळल्या.
दहशतवादी छावण्या
अलिकडच्या अहवालानुसार, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये आता फक्त ४० दहशतवादी छावण्या सक्रिय आहेत, ज्यामध्ये सुमारे ११० ते १३० दहशतवादी आहेत. तर, जम्मू-काश्मीरमध्ये सध्या एकूण १३५ ते १४० दहशतवादी सक्रिय आहेत, त्यापैकी ६० ते ६५ दहशतवादी जम्मूमध्ये आणि ७० ते ७५ दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. यातील ११५ दहशतवादी पाकिस्तानी आहेत.