

श्रीनगर : फरीदाबादमध्ये दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्यातील काही भागाचे पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाचे अधिकारी नमुने काढत असताना श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री अपघाताने झालेल्या स्फोटात ९ जण ठार झाले, तर अन्य ३२ जण जखमी झाले. या स्फोटाने परिसर पूर्ण हादरला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, हा स्फोट अपघाताने झाला, दहशतवादी हल्ला नव्हता, असे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केले आहे. या स्फोटातील मृतांमध्ये एक निरीक्षक, तीन फॉरेन्सिक टीम सदस्य, गुन्हे शाखेचे दोन छायाचित्रकार, दोन महसूल अधिकारी आणि एक शिंपी यांचा समावेश आहे. फरिदाबादमधून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली, जी नौगाम पोलीस स्टेशनमध्ये साठवून ठेवण्यात आली होती आणि त्यांची तपासणी करण्यात येणार होती. ही प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती, कारण स्फोटके अत्यंत संवेदनशील स्वरूपाची होती आणि शुक्रवारी रात्री हा स्फोट अपघाताने झाला असे आता पोलीस महासंचालक यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी रात्री झालेल्या या स्फोटामुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीचा मोठा भाग कोसळला आणि अनेक वाहने जळून खाक झाली. या स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या शरीराचे अवयव ३०० फूट दूरपर्यंत विखुरले गेले. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही जणाची प्रकृती गंभीर आहे. या मोठ्या स्फोटानंतर सतत होणाऱ्या छोट्या स्फोटांमुळे बचाव पथकाला जवळपास एक तास पोलीस ठाण्यात प्रवेश करणे कठीण झाले होते.
पीएएफएफने जबाबदारी स्वीकारली
सध्या तपास यंत्रणा या घटनेचा दोन प्रमुख दृष्टिकोनातून तपास करत आहेत. पोलीस ठाण्याच्या आत ठेवण्यात आलेली सुमारे ३६० किलोग्राम अमोनियम नायट्रेट स्फोटक सामग्री सील प्रक्रिया केली जात होती तेव्हा स्फोट झाला. तर दुसरा आणि अधिक गंभीर मुद्दा हा दहशतवादी हल्ल्याचा आहे. अधिकाऱ्यांना संशय आहे की, परिसरात उभ्या असलेल्या जप्त केलेल्या एका कारमध्ये आयईडी लावला गेला होता, ज्याच्या स्फोटामुळे अमोनियम नायट्रेटच्या मोठ्या साठ्याचा स्फोट झाला. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या शैडो ग्रुप पीएएफएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा केला आहे. मात्र त्याबाबत तपास सुरू आहे.
श्रीनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच जैश ए मोहम्मदच्या टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. देशातील विविध भागांतून डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणातील संशयितांची चौकशी नौगाम पोलीस ठाण्यात सुरू होती. नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोटाबाबत माहिती देताना जम्मू काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात म्हणाले की, ९ आणि १० नोव्हेंबर रोजी फरीदाबाद येथून जप्त करण्यात आलेले स्फोटक पदार्थ, रसायने जम्मू काश्मीरमध्ये आणण्यात आले. नौगाम पोलीस ठाण्याच्या मोकळ्या जागेत सुरक्षितपणे साठवण्यात आले. या साहित्याचे नमुने फॉरेन्सिक टीमकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात येणार होते.
मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत
जम्मू आणि कश्मीर सरकारने शनिवारी नवगाम पोलीस स्टेशनमध्ये अपघाती स्फोटात मृत पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी १० लाख रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली. हे अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले जाईल. गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या अधिकृत 'एक्स' खात्यावर दिली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, राज्याच्या आरोग्यमंत्री सकीना इतू यांनी स्फोटात मृत पावलेल्या काही कुटुंबांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि सरकार या दुःखाच्या काळात प्रभावित कुटुंबांसोबत ठामपणे उभे असल्याचे आश्वासन दिले," असे अब्दुल्ला म्हणाले.
नायब राज्यपालांचे चौकशीचे आदेश
नौगाम पोलीस ठाण्यात अपघाताने झालेल्या स्फोटाच्या चौकशीचे आदेश जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिले आहेत. अपघाताने झालेल्या स्फोटाचे निश्चित कारण काय, याचा शोध घेण्यास आपण सांगितले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.