केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळून ७ ठार; यवतमाळमधील पती-पत्नी आणि चिमुकलीचा करुण अंत

राजकुमार जैस्वाल (वय ४१) एप्रिल महिन्याच्या अखेरीस चारधाम यात्रेला जाणार होते. पण, पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी योजना बदलली आणि पत्नी श्रद्धा (वय ३२)च्या १० जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चारधाम यात्रेचे नियोजन केले होते.
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळून ७ ठार; यवतमाळमधील पती-पत्नी आणि चिमुकलीचा करुण अंत
छाया सौजन्य - इंस्टाग्राम (_yavatmal_district_)
Published on

रुद्रप्रयाग (उत्तराखंड) : केदारनाथजवळील गौरीकुंड येथे रविवारी पहाटे ५.२० वाजता एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये महाराष्ट्रातील जैस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जैस्वाल दांपत्याच्या दोन वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

हे हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिरातून गौरीकुंडला भाविकांना घेऊन चालले होते. रविवारी सकाळी ढगाळ व खराब हवामानामुळे ते गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला. ३० एप्रिलपासून सुरू झालेल्या चारधाम यात्रेपासून आतापर्यंतची ही पाचवी हेलिकॉप्टर दुर्घटना ठरली आहे.

यवतमाळमधील तिघांचा करुण अंत

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कोळसा वाहतूक व्यापारी राजकुमार जैस्वाल यांच्या कुटुंबातील तिघांचा या अपघातात मृत्यू झाला. राजकुमार जैस्वाल (वय ४१) एप्रिल महिन्याच्या अखेरीस चारधाम यात्रेला जाणार होते. पण, पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी योजना बदलली आणि पत्नी श्रद्धा (वय ३२)च्या १० जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चारधाम यात्रेचे नियोजन केले होते. त्यानुसार, देवदर्शनासाठी ९ जून रोजी राजकुमार, श्रद्धा व त्यांची मुलगी काशी हे तिघे तसेच श्रद्धा यांची मोठी बहिण आणि तिचे पती हे केदारनाथ येथे गेले होते. राजकुमार त्यांची पत्नी आणि मुलगी अपघात झाला त्या हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. तर, त्यांचे नातलग दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये होते. सुदैवाने, राजकुमार यांचे पहिल्या पत्नीपासूनचे दोन मुले (विहान, वय ९ आणि आरव, वय ५) चारधाम यात्रेला न जाता पांढरकवडा येथे आजोबांकडे राहिल्यामुळे सुखरूप आहेत.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर घडलेल्या या हेलिकॉप्टर अपघातामुळे हवाई वाहतुकीबाबत प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने संबंधित हेलिकॉप्टर कंपनीची सेवा तत्काळ स्थगित केली असून अनेक सुरक्षा उपाय जाहीर केले आहेत. ही हेलिकॉप्टर सेवा ‘आर्यन एव्हिएशन प्रा. लि.’ या खासगी कंपनीची असून या अपघातग्रस्त ‘बेल-४०७’ हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह महाराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील भाविक होते. प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की, ‘कंट्रोल्ड फ्लाइट इन टू टेरेन’ (सीएफआयटी) हे या अपघाताचे संभाव्य कारण असू शकते. ‘सीएफआयटी’ म्हणजे वैमानिकाच्या पूर्ण नियंत्रणात असलेले हेलिकॉप्टर चुकून जमिनीवर, पाण्यात किंवा अडथळ्यावर आदळणे. विशेष म्हणजे खराब दृश्यमानतेमध्येही हेलिकॉप्टरने उड्डाण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदनसिंह रजवार यांनी सांगितले की, अत्यंत खराब हवामानामुळे गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायणच्यामध्ये हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यानंतर त्याला आग लागली.

या हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी, एक लहान मूल आणि एक वैमानिक असे एकूण सात जण होते. हेलिकॉप्टर गुप्तकाशी येथून सकाळी ५.१० वाजता उड्डाण करून ५.१८ वाजता केदारनाथ हेलिपॅडवर उतरले. नंतर ५.१९ वाजता परतीच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर गौरीकुंडजवळ अपघात झाला, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांमध्ये बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे सदस्य विक्रमसिंह रावत यांचा समावेश आहे. या हेलिकॉप्टरचे वैमानिक राजवीर सिंग चौहान हे माजी सैन्य अधिकारी असून त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ विविध भागांत उड्डाण केले होते. ऑक्टोबर २०२४ पासून ते ‘आर्यन एव्हिएशन’मध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होते.

नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, ‘डीजीसीए’ला उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाच्या कमांड आणि कंट्रोल रूमच्या कार्यपद्धतीचे पुनरावलोकन करण्यास सांगण्यात आले आहे.

‘ट्रान्सभारत एव्हिएशन’च्या ‘व्हीटी-टीबीसी’ (पायलट, योगेश ग्रेवाल) आणि ‘व्हीटी-टीबीएफ’ (पायलट, जितेंद्र हरजाई) या दोन हेलिकॉप्टर्सनीही खराब हवामानात उड्डाण केले होते. त्यामुळे या दोन्ही पायलटचे लायसन्स ६ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत,’ असे हवाई वाहतूक मंत्रालयाने सांगितले.

अपघाताच्या चौकशीचे आदेश

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून दोन दिवसांसाठी चारधाम हेलिकॉप्टर सेवा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यांच्याकडून निष्काळजीपणा झाला आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in