अबकारी घोटाळ्यात केजरीवालच प्रमुख दुवा; अटकेच्या भीतीने समन्स टाळत आहेत -भाजप

गेल्याच आठवड्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून चौथे समन्स बजावण्यात आले होते.
अबकारी घोटाळ्यात केजरीवालच प्रमुख दुवा; अटकेच्या भीतीने समन्स टाळत आहेत -भाजप

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी चार समन्स पाठवले आहेत. मात्र, केजरीवाल एकदाही ईडीसमोर हजर झालेले नाहीत. यावर प्रतिक्रिया देताना भाजपने म्हटले आहे की, केजरीवाल यांना ते अबकारी घोटाळ्यातील प्रमुख दुवा आहेत हे माहीत असल्यानेच अटकेच्या भीतीमुळे ईडीचे समन्स टाळत आहेत.

गेल्याच आठवड्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून चौथे समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार ते गुरुवारी ईडीच्या कार्यालयात उपस्थित होणे अपेक्षित होते. पण, गुरुवारी दुपारी केजरीवाल गोव्याला तीन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. तेथे ते त्यांच्या आम आदमी पक्षाच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत, असे गोवा आम आदमी पक्ष प्रमुख अमित पालेकर यांनी सांगितले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केजरीवाल घाबरले असून त्यांना थंडीत घाम फुटला असून पाय लटपटत आहेत, अशी टिप्पणी केली आहे. केजरीवाल अबकारी घोटाळ्यातील प्रमुख दुवा असल्याची त्यांना जाणीव आहे म्हणूनच ते घाबरत आहेत, असेही भाटिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सला लेखी उत्तर दिले आहे. त्यात आपण अबकारी घोटाळ्यात आरोपीच नाही तर समन्स कशासाठी बजावण्यात येत आहेत, असा प्रतिसवाल ईडीला केला आहे. केजरीवाल यांना निवडणूक प्रचारापासून रोखण्यासाठीच हे करण्यात येत आहे, असा आरोप देखील आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र, आपचे नेते घोटाळ्यात सामील नसून ते ईडीच्या दबावाला बळी पडून भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असे ठामपणे सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in