
नवी दिल्ली : केरळमधील भाजप प्रवक्त्यांनी लाइव्ह टीव्हीवरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ माजली आहे. राहुल गांधी यांच्या छातीत गोळी घालू, असे धक्कादायक विधान केरळ भाजपचे नेते व प्रवक्ते पी. महादेवन यांनी केले. यानंतर काँग्रेसचे नेते के. सी वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली, तसेच सदर प्रवक्त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बांगलादेश आणि नेपाळमध्ये अलीकडेच हिंसाचाराचा जो उद्रेक झाला त्यासंदर्भातील एका चर्चेत सहभागी होताना महादेवन म्हणाले की, अशा प्रकारची निदर्शने भारतामध्ये शक्य नाहीत. कारण येथील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. राहुल गांधी यांनी तसे करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या छाती गोळ्या घालू. यानंतर सोमवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महादेवन आणि भाजपविरोधात राज्यभर निदर्शने केली.
के. सी. वेणुगोपाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, राजकीय क्षेत्रातील मतभेद राजकीयदृष्ट्या आणि संवैधानिक चौकटीत सोडवायला हवेत. मात्र भाजपचे नेते त्यांच्या विरोधकांना लाइव्ह टीव्हीवर जीवे मारण्याची धमकी देत आहेत. निश्चितच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणीविरुद्ध राहुल गांधींच्या लढाईने त्यांना अस्वस्थ केलेले आहे. वेणुगोपाल यांनी या पत्रात राहुल गांधींना सोशल मीडियावर वारंवार देण्यात येणाऱ्या धमक्यांकडेही लक्ष वेधले आहे. यापैकी काही भाजपशी संबंधित लोक आहेत. त्यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्यांचा उल्लेख केला असल्याचे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
थंडपणे आणि नियोजनबद्धपणे ही धमकी दिली असल्याच आरोप करत काँग्रेसने भाजप प्रवक्त्यावर कारवाईची मागणी केली. वेणुगोपाल यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, महादेवन यांनी केलेले विधान हे जीभ घसरण्याचा किंवा अतिरंजित विधानाचा प्रकार नाही. ही थंडपणे आणि नियोजन पद्धतीने दिलेली धमकी आहे. भारतातील एक आघाडीचे राजकीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
महादेवन यांच्या धमकीचा काँग्रेस पक्षाने समाचार घेतला आहे. एका नतद्रष्ट पदाधिकाऱ्याने निष्काळजीपणे आणि जाणुनबुजून जोपासलेल्या द्वेषाच्या विषारी वातावरणाचे हे लक्षण असल्याचे काँग्रेसने म्हटले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी तातडीने या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. अन्यथा राहुल गांधींविरोधात हिंसाचाराला वैधता दिल्याचा परवाना दिलेला आहे अशी समजूत पसरेल, असेही पक्षाने म्हटले आहे.
दरम्यान, थ्रिसूर पोलिसांनी सोमवारी महादेवन यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव श्रीकुमार यांच्या तक्रारीवरून पेरामंगलम पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.