

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात काँग्रेस व डाव्या आघाडीतील पक्ष एकमेकांवर भाजपला मदत करीत असल्याचा आरोप करीत आहेत. २०२४ च्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात आणि २०१६ च्या नेमम विधानसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेसनेच मदत केली, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांनी शुक्रवारी केला.
डाव्या पक्षांनी नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला विरोध केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने, विशेषतः व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेस समितीने संघ परिवाराच्या नेत्यांशी बोलणी केली आहेत, असा दावाही गोविंदन यांनी केला.
केरळमध्ये आजवरच्या इतिहासात भाजपला विधानसभेची नेमम ही केवळ एकच जागा मिळाली आहे, तर लोकसभेची त्रिसूर जागा भाजपला जिंकता आली आहे. हे दोन्ही विजय काँग्रेसच्या मतांमध्ये घट झाल्यामुळेच शक्य झाले, असे गोविंदन म्हणाले.
२०१६मध्ये भाजपने काँग्रेसची मते कमी झाल्यामुळेच नेमममध्ये आपले खाते उघडता आले होते. परंतु २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीने ती जागा पुन्हा जिंकली याकडे त्यांनी लक्ष वेधले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्रिसूरमध्ये काँग्रेसची मते ८४,००० ने कमी झाली. परिणामी भाजप ७४,००० मतांच्या फरकाने विजयी झाला, तर आमच्या मतांमध्ये १६,००० ची वाढ झाली. मग भाजपचा विजय कोणी सुकर केला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्रिसूरमध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली याचा अर्थ काय होतो हे मतदारांना सहज कळू शकेल, असे ते म्हणाले.
त्रिसूरमध्ये अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्या आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे येत्या विधानसभेतही कामगिरी सुधारेल, असा दावा त्यांनी केला. काँग्रेस हा विकासाच्या विरोधात उभा राहणारा विरोधी पक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी केली.