

थिरुअनंतपुरम: केरलम सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे (जीएडी) अधिकृत संकेतस्थळ रविवारी एका संशयित पाकिस्तानी गटाने हॅक केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हे संकेतस्थळ हॅक करण्यात आले आणि त्यावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पोस्ट करण्यात आला. ‘टीम ब्लॅकलीट्स’ या गटाने हे संकेतस्थळ हॅक केल्याचा दावा करणारा संदेश आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही त्यावर पोस्ट करण्यात आल्या. ‘आम्ही पाकिस्तानी हॅकर्स आहोत. दररोज अनेक संकेतस्थळे हॅक केली जातात; आज तुमचा दिवस आहे,’ असा संदेश त्यावर लिहिण्यात आला होता.
संकेतस्थळ हॅक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर होस्टिंग प्रदात्याने ते खाते तात्पुरते निलंबित केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. माहिती चोरी झाली आहे का, याचा तपास सायबर पथक करत असून, सुरक्षितता सुनिश्चित झाल्यानंतर संकेतस्थळ पूर्ववत सुरू केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तसेच, हा विभाग तपासासाठी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवणार असून, लवकरच औपचारिक तक्रार दाखल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.