
केरळच्या त्रिशूर येथून मन हेलावणारी घटना समोर आली आहे. जखमी मांजरीच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने उडवल्यामुळे जीव गमवावा लागला. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
माहितीनुसार, मंगळवारी रात्री रात्री १०.३० वाजता त्रिशूर-मनुथी रस्त्यावरील कालाथोड जंक्शनवर ही घटना घडली. सिजो चिट्टीलापिल्ली (वय-४१) असे मृताचे नाव आहे. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, वर्दळीच्या रस्त्यात अडकलेल्या मांजरीच्या पिल्लाला बघून सिजोने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली आणि पिल्लाला वाचवण्यासाठी धाव घेतली. "पिल्लाला उचलण्यासाठी तो खाली वाकला, त्याआधी त्याने वाहनांना हाताने थांबण्याचा इशाराही केला होता. मात्र, भरधाव वेगात आलेल्या ट्रकने क्षणार्धात त्याला जोरदार धडक दिली", असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ट्रकने सिजोला काही मीटरपर्यंत फरफटत नेले होते. स्थानिकांनी सिजोला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते, पण त्याला मृत घोषीत करण्यात आले. मन्नूथी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सिजो हा प्राणीप्रेमी होता आणि तो कालाथोड येथे राहत होता. त्याने घरात किमान तीन मांजरी आणि पाच कुत्रे पाळले असून तो त्यांना त्यांना कधीही घरी सोडत नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले. त्याच्या आई-वडिलांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला असून एकुलती एक बहीण तिच्या कुटुंबासह परदेशात राहते. "तो जास्त लोकांमध्ये मिसळत नव्हता, पण आम्ही त्याला नेहमीच प्राण्यांची काळजी घेताना पाहिले आहे. तो त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालत असे. त्यामुळे भटके कुत्रे दररोज त्याच्या घराजवळ रस्त्याच्या कडेला त्याची वाट पाहतात," असे सिजोच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले. घटनेनंतर मांजरीच्या पिल्लाने लगेचच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उडी मारली, पण सिझोला मात्र आपला जीव गमवावा लागला.
बघा व्हिडिओ
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकरी हळहळलेत.