१ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची नवी धमकी

येत्या १ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नये, अशी धमकी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने दिली आहे.
 खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू, संग्रहित छायाचित्र
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू, संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : येत्या १ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नये. शिखांच्या संहाराला ४० वर्षे होत असून एअर इंडियाच्या विमानात स्फोट होऊ शकतो, अशी धमकी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने दिली आहे. देशात वाढत्या बॉम्ब अफवांच्या पार्श्वभूमीवर देशात खळबळ माजली आहे. पन्नूच्या धमकीनंतर केंद्रीय गृह खाते सतर्क झाले आहे. ‘शीख फॉर जस्टीस’चा संस्थापक गुरपतवंत सिंह पन्नूने गेल्यावर्षीही अशीच धमकी दिली होती.

गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक विमान कंपन्यांना बॉम्बचे धमकीसत्र सुरू असताना आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताच्या गुप्तहेरांचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाने केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव असताना पन्नूने ही धमकी दिली आहे.

देशातील विमानात बॉम्बच्या धमक्या मिळू लागल्यानंतर केंद्रीय गृह खात्याने सोमवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. केंद्रीय गृह सचिवांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक, नागरी हवाई उड्डाण सुरक्षा विभागाचे महासंचालकांकडून धमक्यांच्या फोनबाबत तपशीलवार माहिती घेतली. याप्रकरणी झालेल्या तपासाची माहिती केंद्रीय गृह सचिवांना देण्यात आली. बहुतेक फोन कॉल्स हे परदेशातून आले आहेत. गेल्या ५ दिवसांत १०० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. सर्व विमानतळावर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्याचे आदेश ‘सीआयएसएफ’ने सर्व विमानतळांना दिले. बॉम्बच्या धमक्यांप्रकरणी आवश्यक त्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश विमान कंपन्यांच्या ‘सीईओं’ना देण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in