
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आता मतदार घोटाळ्याच्या प्रकरणांशी संबंधित माहिती देणे बंद केले आहे. निवडणूक आयोग आता भाजपचे बॅक ऑफिस बनले आहे का? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला आहेत.
“मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, अलांड विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली होती. यासंदर्भात चौकशी सुरू आहे. निवडणूक आयोगाने सुरुवातीला काही कागदपत्रे दिली होती, परंतु आता महत्त्वाचे पुरावे देण्यास नकार देत आहे, जेणेकरून खऱ्या गुन्हेगारांना वाचवता येईल,” असे खर्गे यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने अद्याप खर्गे यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, यापूर्वी निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या मतचोरीच्या दाव्यांना निराधार म्हटले आहे. “मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, तपास संस्थांना अलांड विधानसभा मतदारसंघात ५,९९४ बनावट अर्ज आढळले होते, जे मतदारांना हटवण्याच्या मोठ्या प्रमाणात प्रयत्नाचा पुरावा होते. काँग्रेस सरकारने याप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले. तपासाच्या सुरुवातीला ईडीने पुरावे दिले होते, परंतु आता ते भाजपच्या दबावाखाली माहिती शेअर करत नाही,” अशी टीकाही खर्गे यांनी केली.