
मुंबई: फरार उद्योगपती विजय मल्ल्या आणि किंगफिशर एअरलाइन्सविरुद्धच्या १८० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेला झटका दिला. तपास यंत्रणेने आरोपीचा कबुलीजबाब नोंदवण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. तथापि, विशेष न्यायालयाने सीबीआयच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार देत विनंती धुडकावून लावली.
विशेष सीबीआय न्यायाधीश डॉ. जे. पी. दरेकर यांनी सीबीआयचा अर्ज अधिकारक्षेत्राच्या अभावामुळे फेटाळून लावला. तसेच आरोपीचा कबुलीजबाब नोंदवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेला मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे जाण्यास सांगितले. सीबीआयने २०१६ मध्ये हा खटला दाखल केला होता. या प्रकरणात विजय मल्ल्या, किंगफिशर एअरलाइन्स आणि इतरांवर एअरलाइनवर कर्ज गैरव्यवहाराचा गंभीर आरोप आहे. कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अन्यत्र वळवून दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची १८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी आरोपीचा जबाब नोंदवण्यासाठी परवानगी मागत सीबीआयने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विशेष न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या १० आरोपींपैकी एकाने स्वेच्छेने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अंतर्गत कबुलीजबाब नोंदवण्यासाठी तयारी दर्शवली होती.