किन्नर आखाड्याची मोठी कारवाई; ममता कुलकर्णी, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना महामंडलेश्वर पदावरून हटविले

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान, किन्नर आखाड्याने मोठी कारवाई केली आहे.
किन्नर आखाड्याची मोठी कारवाई; ममता कुलकर्णी, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना महामंडलेश्वर पदावरून हटविले
Published on

प्रयागराज : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान, किन्नर आखाड्याने मोठी कारवाई केली आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवले असून तिला आखाड्यातूनही बाहेर काढले आहे. तसेच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवून, आखाड्यातून काढून टाकण्यात आले आहे. किन्नर आखाड्याला लवकरच एक नवीन आचार्य महामंडलेश्वर मिळेल. तसेच, आखाड्याची नव्याने पुनर्रचना करण्यात येईल, असे ऋषी अजय दास यांनी म्हटले आहे. एका महिलेला किन्नर अखाड्याचे महामंडलेश्वर बनवणे, हे सिद्धांतांना धरून नाही, असेही अजय दास यांनी म्हटले आहे.

अभिनेत्री ममता कुलकर्णीने गेल्या काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात संन्यासाची घोषणा केली होती. ममताने महाकुंभ मेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेतली होती. यानंतर, तिने संगमावर पिंडदानाचा विधीही केला होता. महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतल्यानंतर, ममता कुलकर्णीला 'श्री यमाई ममता नंद गिरी' असे नावही देण्यात आले होते. याचबरोबर तिची किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.

बाबा रामदेव यांचा आक्षेप

ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावरून संतमंडळी निषेधही नोंदवत होते. एवढेच नाही, तर बाबा रामदेव यांनीही ममताला महामंडलेश्वर बनवण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. कालपर्यंत संसारिक सुखांमध्ये रमलेले काही लोक एकाच दिवसात संत बनले आणि महामंडलेश्वरसारखी उपाधीही मिळाली, असे रामदेव यांनी म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in