

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील एका दुर्गम गावात झालेल्या ढगफुटीच्या घटनेत आत्तापर्यंत 'सीआयएसएफ' च्या दोन कर्मचाऱ्यांसह ४६ जणांचा मृत्यू झाला असून ८० जण जखमी झाले आहेत. या जखमींना अथोली रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्यापैकी ३५ जणांना नंतर किश्तवाड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत १६७ जणांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी ३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेनंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, लष्कर आणि स्थानिक स्वयंसेवकांची पथके घटनास्थळी रवाना झाली असून त्यांनी वेगाने मदतकार्य सुरू केले आहे. दुपारी झालेल्या ढगफुटीनंतर पूर आल्याने परिसरातील दुकाने, सुरक्षा चौक्या आणि अनेक बांधकामे वाहून गेली आहेत. दुर्घटना घडली तेव्हा लंगरमध्ये भक्तांची खूप गर्दी होती. घटनेबद्दल प्राथमिक माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, चशोटी भागात ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले असून बचाव पथके घटनास्थळाकडे रवाना झाली आहेत. या घटनेनंतर नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.
पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत - अमित शहा
किश्तवाड जिल्ह्यातील ढगफुटीबाबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा केली. स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे. एनडीआरएफ पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली आहेत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. तसेच पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरचे विरोधी पक्षनेते आणि पद्दर-नागसेनीचे आमदार सुनील कुमार शर्मा म्हणाले की, आमच्याकडे अद्याप कोणतीही संख्या किंवा डेटा नाही, मात्र मोठे नुकसान झाले आहे.
मचैल यात्रेदरम्यान ढगफुटी
किश्तवाडमधील चशोटी भागात अचानक पूर आला, येथून मचैल माता यात्रेला सुरुवात होते. यात्रेचा हा पहिला थांबा आहे. यात्रा जिथून सुरू होणार होती तिथेच ढगफुटी झाली. भाविक त्यांची वाहने येथे पार्क करतात आणि यानंतर २,८०० मीटर उंचीवर असलेल्या मचैल माता मंदिरापर्यंत चालत जातात. येथे बसेस, तंबू, लंगर आणि भाविकांची अनेक दुकाने होती. ती सर्व पुराच्या पाण्यात वाहून गेली.