कोलकाता : राजधानी दिल्लीत झालेल्या निर्भया कांडाची पुनरावृत्ती प. बंगाल सरकारच्या आर. जी. कर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी रात्री झाली. या रुग्णालयात निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला सियालदहा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत केली आहे.
कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात निवासी महिला डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह शनिवारी सापडला. या हत्येच्या विरोधात कोलकाता व प. बंगालमध्ये संतापाचे वातावरण आहे. कोलकात्यात डॉक्टर व नर्सेस रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, महिला डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या केली आहे. पीडितेच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते. तिच्या दोन्ही डोळे व तोंडातून रक्त येत होते. चेहरा, पोट, पाय, मान, हात, ओठावर जखमा आढळल्या आहेत. ही घटना सकाळी तीन ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
ही पीडिता छाती रोग चिकित्सा विभागात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होती. ती गुरुवारी रात्री ड्युटीवर होती. तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहता तिने जोरदार प्रतिकार केला असावा, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणी डाव्यांची विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरली असून भाजपनेही सीबीआय चौकशीची मागणी केली. या हत्येविरोधात संपूर्ण बंगालमध्ये रविवारी रास्ता रोको करण्याची घोषणा डाव्या विद्यार्थ्यांच्या संघटनेने केली.
दोषींना फासावर लटकवणार - मुख्यमंत्री
या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणार असून दोषींना फासावर चढवणार असल्याचे सांगितले. बॅनर्जी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
तपासासाठी एसआयटीची स्थापना
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या पीडित महिला डॉक्टरच्या मानेचे हाड मोडले आहे. या महिलेचा पहिला गळा दाबला असावा. आम्ही शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. यामुळे आम्हाला गुन्हेगारांचा शोध घेण्यास मदत मिळू शकेल. या घटनेच्या चौकशीसाठी कोलकाता पोलिसांनी ‘एसआयटी’ (विशेष चौकशी पथक) स्थापन केले आहे.
सत्य लपवण्याचे प्रयत्न
माझ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. आता सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पीडितेच्या पित्याने केला.