कोलकाता : कार वैद्यकीय महाविद्यालय बलात्कार, हत्याप्रकरणी सीबीआयने सोमवारी सलग चौथ्या दिवशी या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची अनेक तास कसून चौकशी केली.
डॉक्टरच्या मृत्यूचे वृत्त कळताच आपण काय केले, कोणाशी संपर्क साधला, पीडितेच्या पालकांना तीन तास प्रतीक्षा करण्यास का सांगितले, हत्येच्या घटनेनंतर सेमिनार हॉलजवळच्या खोल्यांचे नूतनीकरण करण्याचे आदेश कोणी दिले, अशी प्रश्नांची सरबत्ती घोष यांच्यावर करण्यात आली. घोष यांच्या भ्रमणध्वनीतील नोंदी आणि व्हॉट्सॲपचीही तपासणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केली. महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर दोन दिवसांनी घोष यांनी प्राचार्यपदाचा राजीनामा दिला. आपल्यावर हल्ला होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
सदर व्यक्तीने कीर्तीसोशल या इन्स्टाग्राम वापरकर्ता नावाने कार महाविद्यालयात घडलेल्या तीन घटनांची माहिती अपलोड केली आणि पीडितेचे छायाचित्रही टाकले, अशी तक्रार आल्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या आरोपीने ममता बॅनर्जी यांच्याबद्दलही दोन प्रकारची माहिती पोस्ट केली आणि त्यांना धमक्या दिल्या. या पोस्ट इतक्या प्रक्षोभक होत्या की त्यामुळे समाजांमध्ये तेढ निर्माण झाली असती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
ममतांच्या राजीनाम्याची भाजपची मागणी
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या निर्लज्ज आहेत, असे नमूद करून सोमवारी भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला पाठीशी घालण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या आदेशावरून महत्त्वाचा पुरावा नष्ट करण्यात आला, असा आरोपही भाजपने केला आहे. भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांवरही टीका करताना ही राजकीय गिधाडे असल्याचे म्हटले आहे.
त्यांची बोटे तोडा
दरम्यान, बलात्कार-हत्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना दूषणे देऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांची बोटे तोडण्यात येतील, असे वादग्रस्त वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री उदयन घोष यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची फीत व्हायरल झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडे जे बोटे दाखवित आहेत त्यांची बोटे तोडण्यात येतील, असे म्हणताना घोष या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
...तर आम्ही तुम्हाला वाचविणार नाही
अरूप चक्रवर्ती हे पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार आहेत. ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा निषेध करताना तातडीने कारवाई व्हावी, या मागणीसाठी मोर्चा काढला आहे. अशाच एका मोर्चामध्ये सहभागी झालेले अरूप चक्रवर्ती यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात उलट डॉक्टरांवरच आगपाखड करून त्यांना इशारा दिला आहे. आंदोलनाच्या नावाखाली तुम्ही कदाचित तुमच्या घरी जाल किंवा तुमच्या प्रियकरासोबत जाल. पण जर तुमच्या आंदोलनामुळे इथे एखादा रुग्ण दगावला आणि लोकांनी त्यांचा राग तुमच्यावर काढला तर आम्ही तुम्हाला वाचवणार नाही, असा थेट इशाराच अरूप चक्रवर्ती यांनी दिला आहे. डॉक्टर संपावर आहेत. पण संपाच्या नावावर जर ते बाहेर असतील आणि रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळाले नाहीत, तर त्यांचा राग डॉक्टरांवर निघणे हे साहजिक आहे. आम्ही त्यांना अशा वेळी वाचवू शकणार नाही, असे थेट विधान अरूप चक्रवर्ती यांनी केले आहे.
आरोपीच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी
कोलकाता बलातकार व हत्याकांडातील आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट करण्यासाठी कोलकाता न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली आहे.
एकाला अटक
कार वैद्यकीय महाविद्यालयात ज्या डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली त्या डॉक्टरचे छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धमक्या दिल्याप्रकरणी पोलिसांनी कोलकातामधून एका व्यक्तीला अटक केली आहे.