कोलकाता : कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री आर. जी. कर वैद्यकीय वैद्यकीय रुग्णालयात ४० जणांच्या संतप्त जमावाने घुसून धुडघूस घालत मोडतोड केली. या जमावाने रुग्णालयातील मशिन्स फेकून दिल्या, तसेच फर्निचरची मोडतोड केली. सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. तसेच पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. यात १५ पोलीस जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी ९ दंगेखोरांना अटक केली आहे. दरम्यान, निवासी डॉक्टरांनी पुन्हा संपाला सुरुवात केली आहे.
गुरुवारी मध्यरात्री ४० जणांचा जमाव रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात घुसला. या जमावाने तेथील सर्व सामुग्रीची नासधूस करायला सुरुवात केली. कनिष्ठ डॉक्टर जेथे आंदोलन करत होते ते स्टेज त्यांनी मोडून टाकले.
डॉक्टरांचे संरक्षण करण्यास पोलीस अपयशी ठरल्याची टीका भाजपने केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सरकारला परिस्थिती नियंत्रणात आणता येत नसेल तर लष्कर तैनात करण्याची मागणी भाजपने केली.
पीडित मृत निवासी डॉक्टरला न्याय मिळेपर्यंत प. बंगालमधील निवासी डॉक्टरांनी आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय सेवा कोलमडली आहे. आपत्कालीन व ओपीडी सेवा बंद आहे. रुग्णालयावर हल्ला झाल्याने रुग्णालयातील परिचारिकाही आंदोलनात उतरल्या आहेत.
रुग्णालयाची मोडतोड ही समाजासाठी शरमेची बाब - राज्यपाल
रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. रुग्णालयावरील हल्ला हा समाजासाठी व तरुण मुलीचे संरक्षण करता न येणे ही संपूर्ण मानवजातीसाठी शरमेची बाब आहे. रुग्णालयातील हिंसाचार हा कदापि सहन करणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.
दरम्यान, या हल्ल्यानंतर रुग्णालयाचे संरक्षण पोलिसांनी वाढवले आहे. कोलकात्याचे पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. जे खोट्या बातम्या चालवत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.
तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी आर. जी. कर रुग्णालयात झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांना येत्या २४ तासांत अटक करावी, असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले.
ममता बॅनर्जी यांनी गुंडे पाठवले - अधिकारी
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या बिगर राजकीय आंदोलनात आपले गुंड पाठवले. ममता बॅनर्जी या जगातील सर्वात हुशार व्यक्ती समजतात. लोकांना त्यांची योजना समजणार नाही, असे वाटते. त्यांनी आंदोलकासारखे दिसणारे गुंड कार्यक्रमात पाठवून रुग्णालयाची मोडतोड केली, असा आरोप भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केला.
निवासी डॉक्टरांचा संप पुन्हा सुरू
कोलकात्यातील सरकारी रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या देशव्यापी संघटनेने पुन्हा संप सुरू केला आहे. दिल्लीतील ‘एम्स’, ‘व्हीएमएमसी-सफदरजंग रुग्णालय’, ‘राम मनोहर लोहिया रुग्णालयातील’ निवासी डॉक्टरांनी पुन्हा संप सुरू केला आहे.
आयएएमचे उद्या देशव्यापी संपाचे आवाहन
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे. आयएमएने रुग्णालयांना सुरक्षित स्थळ घोषित करावे. तेथे सीसीटीव्ही व कडक सुरक्षा ठेवायला हवी, अशी मागणी आयएमएचे सरचिटणीस अनिल कुमार जे. नायक यांनी केली.