कोलकात्याच्या चहावाल्याचे अनोखे मेस्सीप्रेम : साडेपाच फुटी पुतळा, अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये रंगलेली इमारत अन् बरेच काही...

दरवर्षी २४ जून म्हणजेच मेस्सीच्या वाढदिवशी पात्रा कुटुंबीय न विसरता मेस्सीच्या वयाइतक्या वजनाचा केक कापून हा दिवस उत्साहात साजरा करतात
कोलकात्याच्या चहावाल्याचे अनोखे मेस्सीप्रेम : साडेपाच फुटी पुतळा, अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये रंगलेली इमारत अन् बरेच काही...

फुटबॉल म्हटले की त्यात जय-पराजय, आवडत्या संघाच्या विजयासाठी होणारी प्रार्थना आणि लोकप्रिय खेळाडूसाठी केला जाणारा उपवास हे नेहमीचेच. मात्र कोलकात्याच्या एक चहावाल्याने या सर्वांवर कुरघोडी केली आहे.

अर्जेंटिनाचा नामांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा निस्सीम चाहता असलेल्या शिवशंकर पात्राने सध्या सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात मेस्सीसह अर्जेंटिनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी संपूर्ण इमारतीलाच निळ्या-पांढऱ्या रंगात रंगवून टाकले आहे. त्याशिवाय विश्वचषकाच्या पहिल्या दिवशी पात्रा कुटुंबीयांनी तब्बल ५० हजार रुपये खर्च करत मेस्सीचा पुतळा साकारला. यासाठी भारताचे माजी फुटबॉलपटू संग्राम मुखर्जी यांना आमंत्रण देण्यात आले होते. याव्यतिरिक्त, दरवर्षी २४ जून म्हणजेच मेस्सीच्या वाढदिवशी पात्रा कुटुंबीय न विसरता मेस्सीच्या वयाइतक्या वजनाचा केक कापून हा दिवस उत्साहात साजरा करतात.

कतारमध्ये सुरू असलेली विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सध्या उपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर आहे. ३५ वर्षीय मेस्सीच्या कारकीर्दीतील हा अखेरचा विश्वचषक ठरण्याची शक्यता असून अर्जेंटिनाने दिमाखात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे यंदा अर्जेंटिना विश्वचषक जिंकून मेस्सीला थाटात निरोप देणार, अशी शिवशंकर यांना खात्री आहे. शिवशंकर यांच्यासह त्यांची पत्नी सपना, मुलगी नेहा, मुलगा शुभम हेसुद्धा मेस्सीसाठी अर्जेंटिनाचा एकही सामना चुकवत नाहीत.

१९८६मध्ये फुटबॉल विश्वातील महान खेळाडू दिएगो मॅरेडोना यांनी अर्जेंटिनाला दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावून दिला. तेव्हापासून शिवशंकर अर्जेंटिनाचे चाहते झाले. पुढे २००५मध्ये मेस्सीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाल्यावर त्याचा खेळ पाहण्यासाठी त्यांनी टेलिव्हिजन संच खरेदी केला. २००६पासून प्रत्येक विश्वचषकाच्या वेळी शिवशंकर आपल्या घराला अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये रंगवतात. निळ्या-पांढऱ्या रंगाची सुंदर तीन मजली इमारत, रस्त्याच्या चोहीबाजूंना लावलेले पताके हे सर्व पाहण्यासाठी शिवशंकर राहत असलेल्या उत्तर २४ परगणा जिल्हा परिसरात तुफान गर्दी जमते. मेस्सीवरील प्रेमामुळे शिवशंकर यांना आता स्वत:हून विविध कार्यक्रमांसांठी आमंत्रित केले जाते.

असे झाले मेस्सीचे पहिले दर्शन

२०११मध्ये मेस्सी प्रथमच भारतात आणि फुटबॉलसाठी खास ओळखल्या जाणाऱ्या कोलकात्यात आला होता. त्यावेळी शिवशंकर यांना मेस्सीचा खेळ ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्याची संधी मिळाली. अर्थातच त्याचा लाभ उठवून त्यांनी अर्जेंटिना-व्हेनेझुएला या मैत्रीपूर्ण सामन्याचा आनंद लुटण्यासाठी कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियम गाठले. या लढतीत मेस्सीने केलेल्या गोलच्या बळावर अर्जेंटिनाने व्हेनेझुएलाला १-० असे पराभूत करत चाहत्यांना आयुष्यभर लक्षात राहील अशी भेट दिली.

सध्या कतारमध्ये सुरू असलेली विश्वचषक फुटबॉल स्पर्धा प्रत्यक्षात जाऊन पाहण्याइतकी माझी ऐपत नाही. मात्र या गोष्टीचे मला जराही दु:ख वाटत नाही. मेस्सीने कधीच निवृत्त होऊ नये, असे मला वाटते असले तरी यंदाचा विश्वचषक जिंकून त्याने सर्व चाहत्यांना अविस्मरणीय भेट द्यावी.

- शिवशंकर पात्रा, मेस्सीचे चाहते

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in