कोलकात्ता : कोलकाता येथील निवासी डॉक्टरवरील बलात्कार व हत्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारने बुधवारी दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले. आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा ‘सीआयएसएफ’ने ताब्यात घेतली आहे. ‘सीआयएसएफ’च्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या सुरक्षेचा बुधवारी आढावा घेतला. दरम्यान, कोलकात्ता बलात्कार-खून प्रकरणी पुढील सुनावणी ४ सप्टेंबरला होणार असल्याचे हायकोर्टाने सांगितले.
माजी प्राचार्य बेवारस मृतदेह विकायचा
आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाचा माजी प्राचार्य संदीप घोष हा बेवारस मृतदेह विकायचा तसेच अनेक गैरव्यवहारात तो सामील होता, असा आरोप एका माजी कर्मचाऱ्याने केला आहे. दरम्यान, संदीप घोष यांची वर्तणूक संशयास्पद असल्याचे सीबीआयचे म्हणणे असून, त्यांची आतापर्यंत अनेक तास चौकशी झाली आहे.
माजी प्राचार्याची ईडीमार्फत चौकशीची मागणी
आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी कोलकाता हायकोर्टात धाव घेऊन माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. घोष यांच्या कार्यकाळात अनेक गैरव्यवहार झाले असून त्यांची ‘ईडी’मार्फत चौकशीची मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.