

चिलकलडोना : आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मंत्रालयाजवळ एका मालवाहू वाहनाची आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ५ महिलांसह किमान ८ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, १० जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक श्री राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी मंत्रालयाकडे जात होते. त्यांच्या वाहनात सुमारे २० प्रवासी होते. पहाटे ३ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग १६७ वर हे वाहन विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरला धडकले.
मृतांमध्ये ५ महिला, २ पुरुष आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. तर १० जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी गंभीर जखमी असलेल्यांना पुढील उपचारासाठी कर्नूल शासकीय सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघाताचे कारण
येम्मीगनूरच्या पोलीस उपअधीक्षक एन. भार्गवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरला डुलकी लागल्याने वाहन चुकीच्या दिशेने गेले आणि हा अपघात झाला. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ही मोठी धडक बसली. तसेच, मालवाहू वाहनात क्षमतेपेक्षा जास्त (२० लोक) प्रवासी असल्याने मृतांचा आकडा वाढला, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले असून, जखमींना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.