
कारगिल : १९९९ मध्ये भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी घुसखोरांची माहिती भारतीय लष्कराला देणारे मेंढपाळ ताशी नामग्याल यांचे लडाखच्या आर्यन व्हॅलीमध्ये निधन झाले. त्यांच्यामुळेच भारतीय सैन्याला सर्वप्रथम पाकिस्तानच्या कारस्थानाचा सुगावा लागला.
कारगिल युद्धाला यंदा २५ वर्षे झाली. या युद्धात ताशी नामग्याल या भारतीय मेंढपाळाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मे १९९९ च्या सुरुवातीला ताशी नामग्याल यांना त्यांची मेंढी सापडत नव्हती. त्या मेंढीचा शोध घेत असताना त्यांना बटालिकच्या पर्वतरांगांमध्ये पाकिस्तानी सैनिक पठाणी पोशाखात बंकर खोदताना दिसले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, लगेच भारतीय सैन्याला याची माहिती दिली. त्यानंतर भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन विजय’ची सुरुवात झाली.
रविवारी ताशी नामग्याल यांना सैन्याने पूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला. “ताशी नामग्याल यांनी नि:स्वार्थी भावनेने जे केले, ते नेहमी लक्षात ठेवले जाईल. त्यांनी देशासाठी जे योगदान दिले, त्यासाठी भारतीय सैन्य सदैव त्यांचे आभारी राहील. एका देशभक्ताचे निधन झाले. लडाखचे वीर तुमच्या आत्म्याला शांती मिळो. दु:खाच्या या प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत,” असे ‘फायर अँड फ्युरी कोर’ने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले.