Video : "यू आर रिस्पॉन्सिबल" शेतकऱ्याचा मुलगा इंग्रजीत बोलल्याने 'मॅडम' भडकल्या; व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गुप्ता यांच्यावर कारवाई केली.
Video : "यू आर रिस्पॉन्सिबल" शेतकऱ्याचा मुलगा इंग्रजीत बोलल्याने 'मॅडम' भडकल्या; व्हिडिओ व्हायरल

मध्य प्रदेशातील अधिकाऱ्यांची मुजोरी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी 'हिट अँड रन' कायद्याविरोधात वाहन चालकांनी सुरु केलेल्या आंदोलनात जिल्हाधिकाऱ्याने एका चालकाची 'औकात' काढली होती. यानंतर आता देवास जिल्ह्यातील सोनकच्छ येथील तहसीलदार अंजली गुप्ता यांनी शेतकऱ्यांशी असभ्य भाषेत वाद घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गुप्ता यांच्यावर कारवाई केली.

सोनकच्छ जवळील कुमारिया राव गावात उभ्या पिकात विजेचे खांब गाडण्यावरुन शेतकरी आणि तहसीलदार यांच्यात बाचाबाची झाली. यादरम्यान, शेतकऱ्याचा मुलगा तहसीसदार गुप्ता यांना इंग्रजीत 'यू आर रिस्पॉन्सिबल' असे म्हणाला. हे ऐकताच गुप्ता यांचा पारा चढला आणि "चूजे हैं ये, अंडे से निकले नहीं, बड़ी-बड़ी मरने-मारने की बात करते हैं", असे म्हटले. पुढे, मी आतापर्यंत शांततेत बोलत होती. पण, मी जबाबदार आहे असे याने म्हटलेच कसे", असे म्हणत त्या मुलाला झापतात.

दोन शब्द शिकले अन् इंग्रजी बोलतायेत-

"हे आम्ही नाही केले, मुलाने केले. आम्ही शांततेत बोलत आहोत. काल पण आम्ही शांततेत बोलत होतो", असे काही स्थानिक सांगतात. त्यावर तहसीलदार, "शांततेत बोलत आहात तर हा मला कसे म्हणाला की मी रिस्पॉन्सिबल आहे? मी कोण आहे? मी तहसीलदार आहे. हा कोणाचा प्रकल्प आहे? सरकारचा प्रकल्प आहे, सरकारला कोणी निवडून दिले? तुम्ही निवडून दिले. मी निवडून दिले का? MPPTL ला मी तिथे खांब गाडायला सांगितले का? मी कशी जबाबदार आहे? दोन शब्द शिकले नाही तर इंग्रजीत यू आर रिस्पॉन्सिबल बोलायला लागले..आले मोठे." असे संतापून म्हणाल्या.

तहसीलदारांनी दिले स्पष्टीकरण-

सोमवारी दुपारी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदार गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "हा व्हिडिओ 11 जानेवारी गुरुवारचा आहे. आम्ही कुमारिया राव गावात गेलो होतो. येथे शेतकऱ्याच्या शेतात 132 KV टॉवर येणार होते. त्यांना समजवायला गेलो होतो की पूर्ण भरपाई दिली जाईल. त्याला त्यांनी सहमती देखील दिली होती. मात्र, काही लोकांकडून असभ्य शब्द वापरले आणि ओघात माझ्याकडून तशी रिएक्शन आली, असे अंजली गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी याची दखल घेतली. अधिकाऱ्यांनी सामान्य माणसांशी बोलताना सभ्य आणि सुसंस्कृत भाषेचा वापर करावा. या प्रकारची असभ्य भाषा अजिबात सहन केली जाणार नाही. माझ्या निर्देशांनंतर जिल्हाधिकाऱ्यांद्वारा तहसीलदारांना भोपाळला जिल्हा मुख्यालयात संलग्नित केले आहे, अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर केली आहे. तसेच, सुशासन हेच आमच्या सरकारचा मूलमंत्र असल्याचेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in