Lakhimpur Kheri : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या 'या' अटी

आशिष मिश्रावर २०२१च्या ऑक्टोबरमध्ये लखीमपूर खेरीच्या (Lakhimpur Kheri) टिकुनियामध्ये ८ शेतकऱ्यांना गाडीने उडून ठार मारण्याचा आरोप
Lakhimpur Kheri : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या 'या' अटी

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) प्रकरणात एक महत्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेते अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra Teni) यांचे पुत्र आणि या प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला (Ashish Mishra) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाच्या अटी घातल्या असून त्याचे उल्लंघन केल्यास हा जामीन रद्द करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्याच्यासोबतच आरोपीला बेदम मारहाण करणाऱ्या ४ शेतकऱ्यांचीही जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्राला ८ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यावेळी न्यायालयाने अटी घातल्या आहेत की, आशिष मिश्राला आठवडाभरात उत्तर प्रदेश सोडावे लागणार आहे. त्याचा राहण्याचा पत्ता पोलिसांना सांगावा लागणार आहे. रोज जवळच्या पोलिस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार आहे. तसेच, त्याने किंवा त्याच्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव टाकल्यास हा जामीन रद्द केला जाऊ शकतो, अशी ताकीद न्यायालयाने दिली आहे.

काय आहे लखीमपूर खेरी प्रकरण?

३ ऑक्टोबर २०२१ रोजी लखीमपूर खेरीमधील टिकुनिया येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चारचाकी गाडीने उडवले. यामध्ये ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आंदोलनातील उपस्थित शेतकऱ्यांनी त्याची ओळख केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला.

logo
marathi.freepressjournal.in