लघुशंका प्रकरण : पीडित तरुणाचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान ; पाय धुत मागितली माफी, व्हिडिओ व्हायरल

जनता माझ्यासाठी देवासमान असून त्यांची सुरक्षा हे माझं कर्तव्य असल्याचही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले
लघुशंका प्रकरण : पीडित तरुणाचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान ; पाय धुत मागितली माफी, व्हिडिओ व्हायरल

दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून एक संतापजनक घटना समोर आली होती. एक मद्यधुंद व्यक्तीने आदिवासी तरुणाला खाली बसवून त्याच्या अंगावर लघुशंका केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याप्रकरणी लक्ष घातलं असून पीडीत आदिवासी तरुणाचा घरी बोलावून सन्मान केला आहे.

गुरुवार (६ जुलै) रोजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या पीडित तरुणाला आपल्या भोपाळमधील निवास्थानी बोलावलं. यानंतर त्यांनी त्या तरुणाला खुर्चीवर बसवून, ते स्वत: खाली बसले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या तरुणाचे पाय धुतले. तसंच त्याला टिळा लावून, हार घालून शाल ओढून त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी या पीडित तरुणाला श्रीगणेशाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पीडित तरुणासोबत घडलेल्या प्रकरणार भाष्य केले. तसंच त्या तरुणाची माफी देखील मागितली. यावेळी त्यांनी जनता माझ्यासाठी देवासमान असून त्यांची सुरक्षा हे माझं कर्तव्य असल्याचही मुख्यमंत्री म्हणाले. तसंच त्यांनी त्या तरुणाची विचारपूस करत तो काय काम करतो, शिक्षण कसं सुरु आहे. मुलांना शिष्यवृत्ती मिळते का ? असे प्रश्न त्यांनी या तरुणाला विचारले. यानंतर या तरुणाला न्याहरी देण्यात आली.

या प्रकरणातील आरोपी प्रवेश शुक्ला याला मध्य प्रदेश पोलिसांकडून यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आल्याचं मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी भाजप डॅमेज कंट्रोल करत असल्याचं म्हटलं जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in