बारावीमध्ये कमी मार्क मिळाल्याने घरमालकाने नाकारले घर ; बंगळुरूमधील घटना

घरमालकाला भाडेकरूला बारावीमध्ये ९० टक्के गुण अपेक्षित होते, मात्र ७५ टक्के गुण मिळाल्यामुळे घर देऊ शकत नाही
बारावीमध्ये कमी मार्क मिळाल्याने घरमालकाने नाकारले घर ; बंगळुरूमधील घटना

बंगळुरु हे आयटी हब आणि स्टार्टअप्ससाठी ओळखले जाते. अनेक तरुण कामानिमित्त बंगळुरूमध्ये शिफ्ट होतात आणि नंतर स्वत:चे भाड्याचे घर शोधण्यासाठी धावाधाव सुरू होते. भाड्याने घर घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे घरमालकांच्या अटीही वाढल्या आहेत. आता बारावीत कमी मार्क मिळाल्यामुळे एका तरुणाला घरमालकाने घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

शुभ नावाच्या व्यक्तीने त्याचा भाऊ योगेशसोबत घडलेला प्रसंग ट्विटरवर कथन केल्याने घरमालकाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. योगेश याला बंगळुरूमध्ये भाड्याने घर हवे असताना त्याने थेट ब्रोकरशी संपर्क साधला. ब्रोकरसोबत बोलणी सुरू असताना त्याने एका घरमालकाच्या अटी योगेशला समजावून सांगितल्या. यावेळी ब्रोकरने योगेशकडून लिन्क्डइन, ट्विटर प्रोफाइल तसेच नव्या कंपनीचे जॉइनिंग लेटर, दहावी आणि बारावीची मार्कशीट, आधार आणि पॅनकार्ड इत्यादी माहिती मागवली. तसेच २०० शब्दांचा लेखही योगेशकडून लिहून घेतला.

योगेशने ही सर्व कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ब्रोकरला पाठवली. ब्रोकरकडून ही कागदपत्रे घरमालकाकडे गेल्यानंतर घरमालकाने योगेशला बारावीत फक्त ७५ टक्के मार्क मिळाल्यामुळे घर नाकारत असल्याचे ब्रोकरला सांगितले. “घरमालकाला भाडेकरूला बारावीमध्ये ९० टक्के गुण अपेक्षित होते, मात्र ७५ टक्के गुण मिळाल्यामुळे घर देऊ शकत नाही,” असे ब्रोकरने योगेशला सांगितले. यावर योगेशनेही या घडल्या प्रकाराचे सुंदर वर्णन केले आहे.

“गुण तुमचे भविष्य ठरवत नाहीत, परंतु तुम्हाला बंगळुरूमध्ये फ्लॅट मिळेल की नाही हे निश्चितपणे ठरवते,” अशा आशयाच्या ओळी त्याने टाकल्या आहेत. विशेष म्हणजे, संबंधिक घरमालक हा आयआयएस या प्रख्यात इन्स्टिट्यूटमधील निवृत्त प्राध्यापक आहेत. त्याच्या या पोस्टनंतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in