कर वाचवण्याचे कायदेशीर मार्ग

कर वाचवण्याचे कायदेशीर मार्ग

कायद्यातील तरतुदींचा वापर करून कर कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील काही मार्गांचा आपण विचार करू या.आपल्या पालकांना घरभाडे देणे: आपण राहत असलेले घर आपल्या आई किंवा वडिलांच्या मालकीचे असेल तर त्यांना तुम्ही घरभाडे देऊन त्याची नियमानुसार वजावट तुमच्या उत्पन्नातून घेऊ शकता. असे भाडे चेकने अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने द्यावे. मिळणारे एकूण भाडे हे मालमत्ता कर वजा करून येणाऱ्या रकमेतून सरसकट ३० टक्के प्रमाणित वजावट घेतल्यावर करपात्र असल्याने आपल्या आयकर विवरणपत्रात ते दाखवून जर काही कर भरावा लागत असेल तर तो घरमालकाने भरावा लागतो. याप्रमाणे आपल्या पालकांना घरभाडे दिल्यास त्यातील काही रकमेवर आपल्याला सूट मिळू शकते. वार्षिक भाडे एक लाख रुपयाहून अधिक असल्यास घरमालकाचे नाव आणि पॅन आयकर विभागास द्यावा लागतो. अशाच पद्धतीने घर पत्नीच्या नावे असल्यास तिलाही घरभाडे देता येईल.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील (NPS) गुंतवणूक : यातील गुंतवणूक तीन प्रकारे फायदेशीर ठरू शकते. यात गुंतवणूक केलेल्या १.५ लाख रकमेस ८० / C नुसार सवलत मिळते याशिवाय आणखी ५० हजार या रकमेवर ८० / CCD(1B) नुसार अधिकची सवलत मिळत असल्याने अशी एकूण सवलत जास्तीत जास्त दोन लाख घेता येऊ शकते. या खात्यात कोणत्याही निर्बंधाशिवाय कितीही गुंतवणूक करता येत असल्याने आपल्या निवृत्तीची तरतूद म्हणून मोठी रक्कम यात जमा करता येऊन त्यावर महागाईवर मात करणारा परतावा मिळवणे शक्य आहे. याशिवाय तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मालकाने यात टाकलेल्या गुंतवणुकीवर मूळ पगाराच्या १० टक्के मर्यादेत (८०/ CCD2) आयकरात सवलत मिळते. अनेक खासगी कंपन्यांचे मालक त्यांच्या कर्मचाऱ्यांना देऊ केलेल्या एकूण पगाराची विभागणी कशी असावी ते विचारतात. या सवलतीचा लाभ घेतल्यास कर सवलत मिळेलच, याशिवाय निवृत्तीसाठी मोठी रक्कम उभारता येणे शक्य आहे.

शेअरवरील करसवलतींचा कल्पक उपयोग- एक दिवसाहून अधिक कालावधीचा व्यवहार करून शेअरबाजारात होणारा निव्वळ फायदा हा भांडवली नफा समजण्यात येतो यातील एक वर्षाच्या आतील नफा हा अल्पकालीन भांडवली नफा समजला जाऊन त्यावर १५ टक्के या विशेष दराने करआकारणी केली जाते, तर एक वर्षाहून अधिक काळाने झालेला नफा हा दीर्घकालीन नफा समजला जाऊन एक लाखाहून अधिक नफ्यावर १० टक्के दराने करआकारणी होते.

जोडीदाराच्या नावे गुंतवणूक- जोडीदारास घरखर्च चालवण्यासाठी दिलेल्या पैशांस करकायद्यात असलेल्या परिशिष्ट ६४ नुसार करदात्याचे उत्पन्न मानले जात नाही; पण जोडीदाराने त्यातून गुंतवणूक केल्यास ते करदात्याचे उत्पन्न मानले जाते; परंतु अशी गुंतवणूक किंवा मिळालेली बक्षिसांची रक्कम शेअर किंवा म्युच्युअल फंड युनिटमध्ये गुंतवल्यास ते उत्पन्न करदात्याचे न समजता जोडीदाराचे समजण्यात येते. त्याला दीर्घमुदतीच्या एक लाख रुपये भांडवली नफ्याचा लाभ घेता येईल. अशी गुंतवणूक करत असताना जोडीदाराचे उत्पन्न कमी असल्यास असे व्यवहार कर वाचवण्याच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकतात.

हिंदू अविभाज्य कुटुंबाची निर्मिती करून गुंतवणूक- कर कायद्याच्या दृष्टीने हिंदू अविभक्त कुटुंब ही एक कृत्रिम; पण स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली वेगळी व्यक्ती समजली जाते. आपल्या उत्पन्नातील काही भाग येथे देऊन त्याची गुंतवणूक केल्यास त्यास उपलब्ध असलेल्या करविषयक सर्व करसवलती मिळवता येतील. त्यातून व्यक्तीची करदेयता कमी होईल. फक्त जितक्या सहज हिंदू अविभक्त कुटुंबाची निर्मिती करता येते, तितक्या सहजासहजी ते विसर्जित करता येत नाही.

कुटुंबातील वरिष्ठ नागरिकांच्या नावे गुंतवणूक- घरातील ज्येष्ठ व्यक्ती कमी उत्पन्न असलेल्या गटात असतील तर त्याच्या नावे गुंतवणूक करून अधिक व्याज मिळवता येईल. सध्या वरिष्ठ नागरिक बचत योजना आणि प्रधानमंत्री वय वंदन योजना येथून मिळणाऱ्या व्याजाचा दर ७.४ टक्के असून तेथे एका व्यक्तीला दोन्ही योजनेत जास्तीत जास्त प्रत्येकी १५ लाख रुपये गुंतवता येतात. याशिवाय आरबीआय फ्लोटिंग रेट बॉण्डमध्ये गुंतवणूक करून ७.१५ टक्के व्याज मिळवता येईल. याशिवाय शेअर्स, म्युच्युअल फंड यात गुंतवणूक करून तेथे मिळत असणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊन करदेयता कमी करता येईल. यात करदात्याची गुंतवणूक पालकांच्या नावाने होत असल्याने भविष्यात वारसात वाटणीवरून वाद उद्भवू शकतात.

सज्ञान मुलांच्या नावे गुंतवणूक- जोडीदाराच्या नावे गुंतवणूक करून ज्या ज्या सवलती मिळवता येतात, त्या सर्व सवलती सज्ञान मुला-मुलींच्या नावे गुंतवणूक करून करदात्यास मिळवता येतील. ही गुंतवणूक मुलांची मानली जात असल्याने त्यांनी ती देण्यास कदाचित नकार दिल्यास मनस्ताप होण्याची शक्यता आहे. असे सर्व व्यवहार करून बरीच करबचत होऊ शकेल फक्त कर वाचवण्याच्या नादात १०० टक्के गुंतवणूक नाहीशी होण्याचा धोका आहे, तेव्हा त्यादृष्टीने काळजी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in