
ढाका : बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार पाडल्याचा दावा संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेला दहशतवादी लश्कर-ए-तोयबाचा (एलईटी) कमांडर मुजम्मिल हाजमीने केला आहे. इतकेच नव्हे, तर त्याने भारतासोबत युद्धाची धमकी दिली आहे.
एका दूरचित्रवाणी वाहिनीने त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातील एक व्यक्ती भारत आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात गरळ ओकत आहे. दूरचित्रवाणी वाहिनीने तो संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला दहशतवादी मुजम्मिल हाजमी असल्याचे म्हटले आहे. तो जो काही बोलत आहे त्यावरून तो पाकिस्तान सरकार आणि तिथल्या सैन्याचा प्रवक्ता असल्याचे दिसून येते. त्याने ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करत बांगलादेशातील सरकार पाडल्याचा दावाही केला आहे.
मोदींचा उल्लेख करीत या दहशतवाद्याने म्हटले आहे की, आम्ही मागील वर्षी बांगलादेशात तुला मात दिली. तू ७ मेला रात्रीच्या अंधारात आला, आम्ही १० मे रोजी उजेडात आलो होतो. आम्ही प्रत्युत्तर देत आहोत, यापुढेही देत राहू. जर तू मैदानात आला, तर आम्हीही मैदानात येऊ, अशी धमकी त्याने दिली आहे.
गेल्या वर्षी बांगलादेशात सत्तांतर झाले. त्यात पंतप्रधान शेख हसीना यांना जीव वाचवून देश सोडावा लागला. तिथे आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी हल्ला केला. या हल्ल्यापूर्वी शेख हसीना सुरक्षित भारतात आल्या. त्यानंतर अंतरिम सरकारची स्थापना झाली.
मोहम्मद युनूस यांच्याकडे देशाची कमान देण्यात आली. बांगलादेशात परकीय शक्तींनी अराजकता माजवून तिथले सरकार पाडले, असा आरोप होत आहे.