सर्वांनी एकत्र येऊन देशाला वाचवू! ‘भारत जोडो’ यात्रेआधी राहुल गांधींचा निर्धार

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी येथून सुरुवात झाली.
सर्वांनी एकत्र येऊन देशाला वाचवू! ‘भारत जोडो’ यात्रेआधी राहुल गांधींचा निर्धार
Published on

“द्वेषाच्या राजकारणामुळे मी वडिलांना गमावले असले, तरी आता आपला देश गमावण्यासाठी तयार नाही. देश वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे,” असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेआधी केले. राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू होण्याआधी तामिळनाडूमध्ये श्रीपेरुंबदुर येथील वडिलांच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन केले.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. यावेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधींच्या हाती तिरंगा ध्वज सोपवल्यानंतर ही यात्रा सुरू झाली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “या सुंदर ठिकाणाहून भारत जोडो यात्रा सुरू करताना मला खूप आनंद होत आहे. राष्ट्रध्वज हा या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा धर्म आणि भाषा दर्शवतो. मात्र भाजप आणि आरएसएसला हा झेंडा त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे, असे वाटते. सीबीआय, ईडी आणि आयटीचा वापर करून भाजप विरोधकांना घाबरवू शकतात. मात्र ते भारतीय नागरिकांना ओळखत नाहीत. भारतीय घाबरत नाहीत. एकही विरोधी पक्षाचा नेता भाजपला घाबरणार नाही.”.

“आज देश सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मूठभर मोठे उद्योग आज संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवतात. पूर्वी भारतावर नियंत्रण ठेवणारी ईस्ट इंडिया कंपनी होती आणि आज संपूर्ण भारताला तीन-चार मोठ्या कंपन्या नियंत्रित करत आहेत,” असेदेखील राहुल गांधी म्हणाले. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून, ही यात्राही त्याचाच भाग आहे. पक्षातून अनेक महत्त्वाचे नेते बाहेर पडत असतानाच ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in