

नवी दिल्ली : विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'एलआयसी' वाढत्या डिजिटल गरजा पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक गुंतवणूक किंवा स्वतःहून स्वतंत्र विभाग सुरू करून फिनटेक क्षेत्रात उतरण्याचा सक्रियपणे विचार करत आहे, अशी माहिती कंपनीचे सीईओ आणि एमडी आर. दोराईस्वामी यांनी दिली.
दोराईस्वामी म्हणाले, आधुनिकीकरणाची गरज पूर्ण करण्यासाठी आणि विशेषतः नवनवीन प्रयोग आणण्यासाठी आम्ही फिनटेक आणि इन्शुरटेक कंपन्यांशी जोडले जात आहोत. या कंपन्यांद्वारे अनेक नवीन गोष्टी विकसित केल्या जात आहेत.
आम्ही स्वतःचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर स्थापन करून व्यावसायिक ॲप्लिकेशन्स विकसित करण्यात स्वतःची क्षमता निर्माण केली आहे. आमच्या आयटी विभागात मोठ्या संख्येने लोक आमच्यासाठी आयटी सोल्युशन्स तयार करत आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही पूर्णपणे स्वावलंबी होऊ शकतो. नवीन पायाभूत सुविधा आणि प्लॅटफॉर्म्ससाठी आम्ही अनेक आयटी सेवा पुरवठादारांची मदत घेतो, असे त्यांनी सांगितले.
कंपनी डिजिटलचा स्वीकार करणार
एलआयसीचे दोराईस्वामी म्हणाले की, आम्ही एक मोठी वित्तीय संस्था असून अनेक संस्थांमध्ये गुंतवणूक करतो. पॉलिसीधारकांच्या निधीवरील परतावा सुधारण्याचा एक मार्ग म्हणून आम्ही कोणत्याही विशेष क्षेत्रातील कंपनीमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करण्याचाही विचार करत आहोत. सार्वजनिक लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवासाविषयी दोराईस्वामी यांनी सांगितले की, डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या सुरुवातीच्या संस्थांपैकी एलआयसी एक होती.