एलआयसीला २५,४६४ कोटी मिळणार; चौथ्या तिमाहीत आयकर परताव्याची अपेक्षा, चेअरमन सिद्धार्थ मोहंती यांची माहिती

या तिमाहीत भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) बाल संरक्षणासह आणखी नवीन उत्पादने लाँच करणार आहे.
एलआयसीला २५,४६४ कोटी मिळणार; चौथ्या तिमाहीत आयकर परताव्याची अपेक्षा, चेअरमन सिद्धार्थ मोहंती यांची माहिती

वृत्तसंस्था/नवी दिल्ली : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाला रु. २५,४६४ कोटींचा आयकर परतावा मिळणार आहे. यासंदर्भातील ऑर्डर प्राप्त झाली आहे आणि हा परतावा चालू तिमाहीत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती म्हणाले.

गेल्या महिन्यात प्राप्तिकर अपीलिय न्यायाधिकरणाने (आयटीएटी) प्राप्तिकर विभागाला २५,४६४.४६ कोटी रुपयांच्या परताव्याची सूचना जारी केली. परतावा मागील सात मूल्यांकन वर्षांमध्ये पॉलिसीधारकांना अंतरिम बोनसशी संबंधित आहे. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत आणि आम्हाला या तिमाहीत आयकर विभागाकडून परतावा मिळण्याची आशा आहे, असे मोहंती यांनी निकालानंतरच्या संवादादरम्यान सांगितले.

ते म्हणाले, या तिमाहीत भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) बाल संरक्षणासह आणखी नवीन उत्पादने लाँच करणार आहे. तिसऱ्या तिमाहीत एलआयसीने जीवन उत्सव, इंडेक्स प्लस आणि आणखी काही उत्पादने लाँच केली. त्यामुळे नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीएनबी) मार्जिन पातळी १६.६ टक्क्यांपर्यंत वाढविण्यास मदत झाली. परताव्यामुळे चौथ्या तिमाहीत महामंडळाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

सरकारी मालकीच्या विमा कंपनीने गेल्या आठवड्यात डिसेंबर २०२३ ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ४९ टक्क्यांनी वाढ नोंदवून तो ९,४४४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तो मागील वर्षीच्या वरील कालावधीत ६,३३४ कोटी रुपये झाला होता.

एलआयसीचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत १,१७,०१७ कोटी रुपयांवर पोहोचले असून मागील वर्षी याच कालावधीत ते १,११,७८८ कोटी रुपये होते.

एलआयसीचे एकूण उत्पन्नही गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तिमाहीत रु. १,९६,८९१ कोटींच्या तुलनेत वाढून यंदा रु. २,१२,४४७ कोटी झाले आहे. एलआयसी संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २४ साठी प्रत्येकी १० रुपयांच्या दर्शनीमूल्याच्या प्रति इक्विटी शेअर ४ रुपये अंतरिम लाभांश मंजूर केला आहे.

डिसेंबर २०२२ ला संपलेल्या नऊ महिन्यांतील नफा २२,९७० कोटी रुपये असून त्याची तुलना करता येत नाही कारण त्यात २०२१-२२ च्या शेवटच्या तिमाहीसाठी उपलब्ध सॉल्व्हन्सी मार्जिनवरील वाढीशी संबंधित ४,५४२ कोटी रुपये (निव्वळ कर) यांचा समावेश होता. तो, ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘नॉन-पार’ फंडातून भागधारकांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले, असे मोहंती म्हणाले होते. ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण प्रीमियम उत्पन्न ३,४२,२४४ कोटी रुपयांच्या तुलनेत एका वर्षापूर्वी २,२२,७७६ कोटी रुपये झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in